Bihar Assembly Election 2025 First Phase Voting: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, दरभंगा, सारण, सिवान, गोपालगंज, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या प्रमुख्या १२१ जागांवर मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहार सरकारच्या १४ मंत्र्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि मंत्री विजय कुमार सिन्हा हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत. संध्याकाळी पाच पर्यंत ६० टक्के मतदान झालं आहे. गेल्या वेळी ही टक्केवारी ५५ टक्के होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, मतदानाचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स लिहिले की, “आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. विधानसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील सर्व मतदारांना मी उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने, राज्यातील माझ्या सर्व तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. लक्षात ठेवा: आधी मतदान करा आणि नंतर नाश्ता.”

बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमदवार तेजस्वी यादव यांनीही मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “लोकशाही, संविधान आणि मानवतेसाठी मतदान महत्त्वाचे आहे.”

आम्हाला मतदान करू दिले नाही; दोन महिलांचा दावा

दोन महिलांनी दावा केला आहे की, त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करू दिले नाही. श्रेया मेहता नावाच्या एका महिलेने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, “मतदान अधिकाऱ्याने आम्हाला स्लिप दिली नाही. ती डिजिटल पद्धतीने डाउनलोड करण्यास सांगितले. माझे नाव मतदार यादीत आहे. आता मला स्लिप आणण्यास सांगितले जात आहे, अन्यथा मला मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. माझ्याकडे माझे मतदार ओळखपत्र देखील आहे. माझे नाव यादीत आहे. आम्ही सकाळी ६:३० वाजल्यापासून येथे वाट पाहत आहोत. आता आम्ही परत जात आहोत, आम्ही मतदान करणार नाही.”

दरम्यान, अनुपमा शर्मा नावाच्या एका महिलेने म्हटेल की, “मला मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नाही. ते म्हणत आहेत की माझ्याकडे स्लिप नाही. माझे नाव यादीत आहे. माझ्याकडे माझे ओळखपत्र देखील आहे. मी आता मतदान करणार नाही. मला पाच मिनिटे वाट पाहण्यास सांगण्यात आले आहे. आम्हाला पहिल्यांदाच अशी समस्या आली आहे.”

नक्षलग्रस्त भीमबांधमध्ये २० वर्षांनंतर मतदान

बिहारमधील नक्षलग्रस्त भीमबांध परिसरात २० वर्षांत पहिल्यांदाच मतदान होत आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे बूथ क्रमांक ३१० आहे. येथे २० वर्षांनंतर मतदान होत आहे. काही वर्षांपूर्वी एक अप्रिय घटना घडली, ज्यामुळे तिथे मतदान थांबले. आम्ही त्या भागाला भेट दिली आणि मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे मतदान करता येईल असे आश्वासन दिले. आम्ही लोकांमध्ये मतदानासाठी जागरूकता देखील निर्माण केली.”

दुपारी १ वाजेपर्यंत ४२.३१% मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४२.३१% मतदान झाले आहे. गोपाळगंज जिल्ह्यात सर्वाधिक ४६.७३% मतदान झाले आहे.

उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या वाहनावर हल्ला

बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज १२१ जागांवर मतदान होत आहे. या दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय येथील भाजपा उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विजय सिन्हा म्हणाले की, “हे राजदचे गुंड आहेत. एनडीए सत्तेत येणार आहे, तेव्हा त्यांच्या छातीवर बुलडोझर चालवला जाईल. गुंड मला गावात प्रवेश करू देत नाहीत. त्यांनी माझ्या मतदान एजंटला हाकलून लावले आणि त्याला मतदान करण्यापासून रोखले. त्यांची गुंडगिरी पहा. हे खोरियारी गावातील बूथ क्रमांक ४०४ आणि ४०५ आहेत.”

दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.७७% मतदान

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. यामध्ये दुपारी ३ पर्यंत ५३.७७ टक्के मतदान झाले आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.