Bihar Assembly Election 2025 Prashant Kishor : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी देखील मोर्चेबांधणी केली असून प्रचारसभा, प्रचारफेऱ्या व समाजमाध्यमांवर प्रचाराचा धुरळा चालू आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष देखील बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर आहे. स्वतः प्रशांत किशोर बिहारमध्ये फिरत आहेत. दरम्यान, शनिवारी (२० सप्टेंबर) एका प्रचारसभेत बोलताना प्रशांत किशेर यांनी नागरिकांना धर्म व जातीच्या आधारावर मतदान न करण्याचं आवाहन केलं.

प्रशांत किशोर मतदारांना उद्देशून म्हणाले, “निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला पैसे देऊ करतील. तुम्ही ते पैसे घ्या. तुम्ही ते पैसे घ्यायलाच हवेत. पैसे का घ्यायचे तेसुद्धा सांगतो. गेल्या पाच वर्षांमध्ये राशन कार्ड बनवण्यासाठी या लोकांनी तुमचे पैसे खाल्ले, जातीचे दाखले बनवण्यासाठी पैसे घेतले, गावागावात या लोकांनी दारू विकली, दारुसाठी दुप्पट-तिप्पट पैसे घेतले. १०० रुपयांची दारू ३०० रुपयांमध्ये विकली. वीजेचं बिल दुप्पट केलं. पोलीस ठाण्यातील अधिकारी तुमच्या मुलांना त्रास देतोय. तुमच्या मुलांना कोठडीत डांबून त्याला सोडण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतो. त्यामुळे निवडणुकीत या लोकांनी पैसे दिले तर ते घ्या.”

…म्हणून तुम्ही पैसे घ्यायला हवेत : प्रशांत किशोर

निवडणूक रणनितीकार म्हणाले, “जमिनीचे व्यवहार करताना, वडिलोपार्जित जमीन आपल्या नावे करताना सरकारी अधिकारी आपल्याकडून पैसे घेतात. या लोकांनी पाच वर्षांमध्ये आपल्याला लुटून पैसे जमवले आहेत. त्यापैकी १००, २०० रुपये देत असतील तर तुम्ही ते घ्यायला हवेत. परंतु, पैसे घेतल्यानंतर एक मंत्र लक्षात ठेवा. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे. तो मार्ग आपल्याला सोडायचा नाही. तुमच्या आयुष्यातील एक मत यावेळी कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाला, जातीला, धर्माला देऊ नका. तुमच्या आयुष्यातील हे एक मत तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी द्या.”

आपल्या मुलांची काळजी कशी घ्यायची ते लालू प्रसाद यादवांकडून शिका : प्रशांत किशोर

जनसुराजचे प्रमुख म्हणाले, “तुम्ही हिंदू असाल किंवा मुसलमान, तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी करायला हवी. आपल्या मुलांची काळजी कशी घेतात ते लालू प्रसाद यादव यांच्याकडून शिकायला हवं. त्यांचा मुलगा नववीपर्यंत देखील शिकलेला नाही. तरी लालू यांना वाटतं की त्यांचा मुलगा बिहारचा राजा व्हावा. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी करायला हवी. ते १० वी, १२ वी शिकलेत. अनेक जण पदवीधर आहेत तरीदेखील त्यांना साध्या शिपायाची नोकरी देखील मिळत नाही.”