पीटीआय, पाटना

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. यानिमित्ताने जवळपास महिनाभर चाललेल्या आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक लढाईचा शेवट झाला. यापूर्वी १२१ विधानसभा मतदार संघांच्या पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी विक्रमी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मंगळवारी, ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अखेरच्या दिवशी प्रचारसभा घेतल्या. राहुल गांधी यांनी किशनगंज आणि पूर्णिया जिल्ह्यात सभांना संबोधित केले. अमित शहा यांनी सासाराम आणि अरवल येथे, तर राजनाथ सिंह यांनी औरंगाबाद आणि कैमूर जिल्ह्यात सभा घेतल्या. दुसऱ्या टप्प्यात चकाई मतदारसंघातून संयुक्त जनता दलाचे (जदयु) उमेदवार मंत्री सुमित कुमार सिंह, भाजप आमदार श्रेयसी सिंह यांचा जमुई, जदयुचे उमेदवार मंत्री लेशी सिंह यांचा धम्मदाह आणि भाजपचे मंत्री नीरज कुमार सिंह यांच्या छतापूर मतदारसंघांचा समावेश आहे.

बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो व्यतिरिक्त १४ सभा घेतल्या. राहुल यांनी एकूण १५ सभा घेतल्या. काही महिन्यांपूर्वी १५ दिवस चाललेल्या ‘मतदार अधिकार यात्रे’चे नेतृत्व त्यांनी केले होते. तत्पूर्वी बिहारमध्ये काही दिवस तळ ठोकून शहा यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. या शिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनीही पहिल्यांदाच बिहारमध्ये प्रचार केला. त्यांनी १० सभा आणि एक रोड शो करून जोरदार प्रचार केला. तर या निवडणुकीचा ‘एक्स फॅक्टर’ मानल्या जाणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला होता.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अखेरच्या दिवशीच्या प्रचार सभांत राजकीय नेत्यंमध्येा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सासाराम येथील प्रचार सभेत ‘इंडिया’ आघाडीवर घुसखोरांसाठी कॉरिडॉर बनवल्याचा आरोप केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठेही गेले तरी त्यांना ‘मत चोरी’ केल्याबद्दल पकडले जाईल, असा दावा राहुल गांधी यांनी किशनगंज येथील प्रचार सभेत केला.