लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि ‘महागठबंधन’ या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही. या घोळातच मंगळवारी भाजपने ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, ‘रालोआ’च्या जागावाटपाची संयुक्त घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, ‘महागठबंधन’चे जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले नसतानाच लालूप्रसाद यादव यांनी उमेदवारांना तिकीट वाटप केल्याने विरोधकांमध्येही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.
पाटणामध्ये रालोआतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटपाची अधिकृत घोषणा होणार होती. मात्र, हिंदुस्थान आवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी जागावाटपावर मंगळवारी नाराजी व्यक्त केली. “जागावाटपामध्ये कमी जागा मिळाल्या असून त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे,” असे मांझी यांनी एक्सवर लिहिले.
चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती (रामविलास पासवान) यांच्या पक्षाला २९ जागा देण्यात आल्या असल्या तरी, प्रत्यक्षात त्यांना कोणत्या जागा दिल्या जातील हे निश्चित झालेले नाही. नितीशकुमार यांच्या जनता दलाने (सं) पासवान यांना दिलेल्या काही जागांवर दावा केल्यामुळे वाद वाढला आहे. समाजमाध्यमांवर मात्र चिराग पासवान व जीतनराम मांझी यांनी ‘रालोआ’ एकत्र लढेल, बिहारमध्ये जंगलराज येऊ देणार नाही, असा दावा केला आहे.
विरोधकांच्या ‘महागठबंधन’च्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत मंगळवारी देखील एकमत झाले नाही. काँग्रेस कमी जागांवर लढण्यास तयार नसून गेल्या वेळी जिंकलेल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांसह इतर काही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसने गेल्यावेळी इतकाच ७० जागांची अपेक्षा असल्याचे स्पष्ट झाले. ‘माकप-माले’नेही जास्त जागांची मागणी केली असल्याने ‘महागठबंधन’च्या जागावाटपावर मंगळवारी अंतिम निर्णय झाला नाही.
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १७ ऑक्टोबर शेवटची तारीख असून त्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत.
लालूंचे परस्पर तिकीटवाटप
‘महागठबंधन’च्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मर्जीतील काही नेत्यांना परस्पर उमेदवारी दिली. तेजस्वी यादव दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी जागावाटपासंदर्भात बोलणी करत असतानाच लालूंनी तिकीटवाटपाचा निर्णय घेतला. त्यामुळे तेजस्वी यादव तातडीने पाटणाला पोहोचले. त्यांनी उमेदवारी दिलेल्या नेत्यांना बोलवून त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली. ‘महागठबंधन’मध्ये लालूंच्या या कृत्यामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.