बारा वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्ष व नितीश कुमार यांची जदयू एकमेकांच्या विरोधात उभे होते, तेव्हा नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींच्या एका कृतीवर टीका केली होती. तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या एका कार्यक्रमात स्कल कॅप घालण्यास नकार दिला होता. पण आता १२ वर्षांनंतर जेव्हा नितीश कुमार भाजपाला सोबत घेऊन आगामी बिहार विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करत आहेत, तेव्हा खुद्द नितीश कुमार यांनीदेखील अशाच एका कार्यक्रमात स्कल कॅप घालण्यास नकार दिल्याचं दिसून आलं. त्यांच्या या कृतीची आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

नेमकं काय घडलं?

बिहार राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या एका कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. नितीश कुमार त्यांचे सहकारी अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद जामा खान यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आयोजकांकडून नितीश कुमार यांचं स्वागत करताना त्यांना स्कल कॅप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नितीश कुमार यांनी ही कॅप घालण्यास नकार देत त्यांचे सहकारी मंत्री मोहम्मद खान यांना ती कॅप घातली. बिहारमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये तेथील मुस्लीम समुदायाच्या १८ टक्के मतं महत्त्वाची ठरणार असताना नितीश कुमारांच्या या कृतीवरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

१२ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

१२ वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ साली नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदींनी अशा प्रकारे टोपी घालण्यास नकार दिला होता. तेव्हा नितीश कुमार यांच्याकडे मोदींसमोर पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. यावेळी नितीश कुमार यांनी “ज्यांना देश चालवायचा आहे, त्यांना टोपीही घालता आली पाहिजे आणि टिळाही लावता आला पाहिजे”, असं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी कुणाचं नाव जरी घेतलं नसलं, तरी त्यांचा इशारा थेट नरेंद्र मोदी यांच्याच दिशेनं असल्याचं दिसून येत होतं.

जदयूकडून नितीश कुमारांच्या कृतीवर सारवासारव

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर संयुक्त जनता दलाकडून नितीश कुमार यांनी स्कल कॅप नाकारण्याच्या कृतीवर स्पष्टीकरणादाखल सारवासारव करण्यात आली आहे. “ती स्कलकॅप एक प्रकारे मुकुटच असून तो त्यांचे मंत्री मोहम्मद जामा खान यांच्या डोक्यावर घालून अल्पसंख्याक समाजाबद्दलचा आदरच अधोरेखित केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कायमच बिहारमधील मुस्लिमांसाठी काम केलं आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं आचरण केलं आहे”, अशी प्रतिक्रिया जदयूचे आमदादर खालिद अन्वर यांनी दिली आहे.