बिहारच्या जमुई जिल्ह्यात शिक्षण विभागाने १३ शिक्षकांवर कारवाई केली आहे. त्यांचा Bed Performance असल्याचा शेरा शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकात दिला गेला आहे. सतत गैरहजर राहिल्यानंतर शिक्षण विभागाने हा शेरा मारला असून शिक्षकांचे वेतन कापून दंड देण्यात आला आहे. मात्र शिक्षण विभागाच्या पत्रकात Bed Performance हा शेरा आता चर्चेचा विषय ठरत आहे. Bad Performance असे म्हणायचे असताना शिक्षण विभागानेच स्पेलिंग चुकविल्यामुळे बिहारच्या शिक्षण विभागाला ट्रोल केले जात आहे. याआधीही बिहारच्या शिक्षण विभागाने केलेल्या अनांगोदी यानिमित्ताने पुन्हा एकदा चघळल्या जात आहेत.
झाले असे की, जमुईच्या शिक्षण विभागाने २२ मे रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता तिथे धडकण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी न सांगता दांडी मारल्याचे लक्षात आले. तसेच अनेक शिक्षक असमाधानकारक सेवा बजावत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर जिल्हा शिक्षण विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला. संबंधित शिक्षकांचे वेतन कापण्यासाठी शासकीय आदेश काढला. मात्र या आदेशात बॅडची स्पेलिंग बेड केल्यामुळे शिक्षण विभागाचेच हसे झाले.
१३ शिक्षकांना कारवाईचे पत्र मिळाल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर हे पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले. प्रकरण उजेडात येताच शिक्षण विभागानेही धावाधाव करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकून बेड परफॉर्मंन्स लिहिले गेले, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत शिक्षण विभागाचीही बरीच नाचक्की झाली.
विशेष म्हणजे २२ मे रोजीच्या पत्रात चूक केल्यानंतर जमुई शिक्षण विभाग सुधारले नाही. न्यूज १८ ने दिलेल्या बातमीनुसार, शिक्षण विभागाने २७ मे रोजी पाठविलेल्या पत्रातही सावळा गोंधळ घातला. वेगवेगळ्या तालुक्यातील सात शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांना पाठविलेल्या पत्रात शिक्षकांच्या नावाच्या जागी शाळेचे नाव आणि शाळेच्या नावाऐवजी शिक्षकांचे नाव टाकले होते. या पत्रामुळे जमुई शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.