बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. ६४.४६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. राजदचे तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या प्रमुख नेत्यांसह १६ मंत्री पहिल्या टप्प्यासाठी रिंगणात आहेत. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून उपमुख्यमंत्री सिन्हा यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बिहारमधील १८ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. बेगुसराय जिल्ह्यात सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदान झाले, त्यानंतर समस्तीपूर (६६.६५ टक्के) आणि मधेपुरामध्ये (६५.७४ टक्के) अधिक मतदान झाले. राजद नेते आणि ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी कुटुंबासह पाटण्यात मतदान केले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, राजीव रंजन सिंह आणि उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव तिसऱ्यांदा रिंगणात आहेत.
राजधानी पाटणामध्ये ४८.६९ टक्के मतदान झाले. पाटण्यातील बांकीपूर, दिघा, कुम्हारार या शहरी मतदारसंघांमध्ये मतदारांचा उत्साह कमी दिसून आला.
बिहारमध्ये या निवडणुकीपूर्वी मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम हाती घेण्यात आली होती. निवडणुकीच्या प्रचारातही ‘एसआयआर’चा मुद्दा गाजला होता. मतदानाच्या दिवशीही काही ठिकाणी विरोधकांनी एसआयआरच्या विरोधातील फलक हाती घेतले होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला?
बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांच्या ताफ्यावर राजद समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप केला. राजदच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप करतानाच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सिन्हा म्हणाले.
