Bihar govt officials burned Rs 500 Notes : बिहारमध्ये एका सरकारी अभियंत्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात प्रशासनाला मोठे घबाड सापडल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्याला अटक करण्यापूर्वी एक नाट्यमय प्रकार घडल्याच पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOU) अशी माहिती मिळाली की मधुबनी येथील ग्रामीण बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद कुमार राय हे संध्याकाळ एका पांढऱ्या इनोव्हा कामधून त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. आणि त्यांच्याकडे पाच कोटींची रोकड आहे. या माहितीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली.
एडीजी (EOU) नय्यर हसनैन खान यांनी आरोप केला की, “एका खात्रीशीर सूत्राने आम्हाला माहिती दिली की सीतामरी जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या राय यांच्याकडे बेकायदेशीर कामांमधून जमवलेली ५ कोटींची रोकड आहे.”
ही माहिती मिळाल्यानंतर प्रतिसाद म्हणून, डीजीआय मानवजीत सिंह ढिल्लोन यांच्या देखरेखीखाली आणि एसपी कुमार इंद्र प्रकाश आणि डीसीपी-कम- एसएचओ राकेश कुमार यांच्या नेतृत्वाखीली एक विशेष ईओयू पथक तयार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी हे पथक पाटण्यातील भूतनाथ रोडवरील या अधिकाऱ्याच्या चार मजली निवासस्थानी शोध घेण्यासाठी पोहोचले.
पथक पोहचले पण…
“पहाटे छापा टाकण्याची योजना होती. मात्र पथक तेथे पोहचले तेव्हा संशयिताच्या पत्नीने ती घरात एकटीच असल्याचे कारण देत घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर पोलिसांना घरात काहीतरी जळल्याचा वास आला. “जेव्हा आम्ही तिच्याकडे पुन्हा विचारणा केली, तेव्हा तिने सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.
अखेर महिला पोलिसांना बोलवलं
अखेर काही वेळानंतर स्थानिक आगमकुआन पोलीस ठाण्यातून महिला अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. तिने सहकार्य न केल्यास जबरदस्तीने आत प्रवेश करू असे या अधिकाऱ्याच्या पत्नीला सांगितल्यानंतर, तिने सकाळी ९:३० च्या सुमारास पथकाला घराच्या आत येऊ दिले. जेव्हा घरात शोध घेण्यात आला तेव्हा ईओयू अधिकाऱ्यांना तळमजाला आणि पहिला मजला भाड्याने देण्यात आल्याचे, तर उरलेले तीन मजल्यांवर राय आणि त्याचे कुटुंब राहात असल्याचे आढळून आले.
घरात काय सापडलं?
“शोध सुरू असताना, आम्हाला घराच्या शौचालयाच्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात जळालेल्या आणि खराब झालेल्या ५०० रुपयांच्या चलनी नोटा आणि त्यांचे अवशेष आढळले,” असा आरोप ईओयू अधिकाऱ्यांनी केला. घरातील ड्रेन तुंबल्याचे आम्हाला आढळून आले, जे साफ करण्यासाठी पथकाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली.
आम्ही अर्धवट जळालेल्या आणि न जळालेल्या नोटा तसेच अतिरिक्त कागदपत्रे जप्त केली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुरावे जतन आणि गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेला मदतीसाठी बोलवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“शोध सुरू असताना आम्हाला घरातील पाण्याच्या टाकीमध्ये पॉलिथिनच्या पॅकेटामध्ये लपवलेल्या आणखी ५०० रुपयांच्या नोटा सापडल्या,” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, पथकाने ५२ लाख रुपये रोख, सुमारे २६ लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने, इन्शुरन्स पॉलिसी कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे आणि इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली.
विनोद कुमार राय हा घरातील तळमजल्यावर लपून बसलेला आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, तो बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेला होता. शोध कारवाईत अडथळा आणल्याबद्दल त्याच्या पत्नीसह त्याला अटक करण्यात आली आहे, असे एडीडी खान यांनी सांगितले.
दरम्यान राय जेथे अतिरिक्त जबाबदारी सांभळत होता ते सीतामरी आणि तो जेथील आहे त्या समस्तीपूर या दोन्ही ठिकाणी सध्या तपास केला जात आहे.