Bihar Crime News : बिहारमधील पाटण्याजवळील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात दोन सख्या भावंडांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आपल्या मुलांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पाटण्याजवळ असलेल्या जनिपूर या गावात घडलेल्या या घटनेने संपू्र्ण पाटणा शहरात खळबळ उडाली आहे. दोन सख्ख्या भावंडांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले आहेत. या मुलांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की अज्ञातांनी आधी मुलांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून टाकण्यासाठी घराला आग लावली.
अंजली (१५) आणि अंशूल (१०) असं घटनेतील मृत बहीण-भावाचं नाव आहे. ही घटना घडल्यानंतर मुलांच्या पालकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मृतांच्या वडिलांना हत्येचा संशय
मृत मुलांच्या वडिलांनी सांगितलं की “गावकऱ्यांना आमच्या घराजवळ दोन ते तीन माणसं दिसली होती. त्यानंतर माझी १५ वर्षांची मुलगी व १० वर्षांचा मुलगा खोलीत मृतावस्थेत आढळला. आधी त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांच्यासह घर पेटवण्यात आलं. हा अपघात असता तर मुलांनी जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला असता. घराचं दार उघडलं असतं. किमान तसा प्रयत्न तरी केला असता. परंतु त्यांच्याकडून असा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नाही. त्यावरून असं सिद्ध होतंय की कोणीतरी त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.”
मृत मुलांचे वडील सरकारी कर्मचारी आहेत, तर त्यांची आई एम्स रुग्णालयात परिचारिका आहे. मृत मुलांचेवडील कामावरून घरी आले तेव्हा त्यांना हे भयानक दृश्य पाहून धक्का बसला. दरम्यान, पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दोन जळालेल्या मृतदेहांची पुष्टी केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की “नातेवाईकांनी हत्येचा आरोप केला असून त्यांचा आरोप लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करत आहोत.”