Bihar ADG Viral Statement: बिहारमध्ये गेल्या दोन आठवड्यांत सुमारे १२ लोकांची हत्या किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले असून, हिंसक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी वाढलेल्या या हल्ल्यांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पण या वाढलेल्या हत्यांप्रकरणी बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुंदन कृष्णन यांनी अजब विधान केले असून, “पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडे काम नसते, म्हणून हत्या वाढल्या आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे. या विधानानंतर त्यांच्यावर देशभरातून प्रचंड टीका होत आहे.

या प्रकरणी बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक कुंदन कृष्णन म्हणाले की, “अलीकडे बिहारमध्ये अनेक हत्या झाल्या आहेत. बहुतेक हत्या एप्रिल, मे आणि जून महिन्यांत होतात. पाऊस येईपर्यंत हे प्रकार चालूच असतात, कारण बहुतेक शेतकऱ्यांकडे काम नसते. पावसाळ्यानंतर, शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे अशा घटना कमी होतात.”

ते पुढे म्हणाले, “असले प्रकार वर्षानुवर्षे घडत आहेत. पाऊस सुरू झाला की, शेतकरी व्यस्त होतो आणि अशा घटना कमी होतात. पण या वर्षी माध्यमांनी वारंवार होणाऱ्या हत्यांवर प्रकाश टाकला आहे आणि निवडणुकाही होत असल्याने राजकीय पक्ष यावर अधिक लक्ष देत आहेत. आम्हाला चिंता आहे की, तरुण पैशासाठी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.”

अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला. विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी या विधानावर टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पोलीस अधिकाऱ्यांनी अशी विधाने करू नयेत. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची होते. पोलीस हे मान्य करत आहेत की गुन्हेगारी वाढली आहे. प्रत्येक ऋतूत बिहारमध्ये गुन्हेगारी असते. उन्हाळ्यात ते उष्णतेला दोष देतील; हिवाळ्यात ते थंडीला दोष देतील. मुख्यमंत्री काहीही करत नाहीत आणि उपमुख्यमंत्री निरुपयोगी आहेत”, असे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.