Bihar RJD MLCs Digitally Arrested : देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये सायबर फसणवुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. वृद्ध नागरिक ते सुशिक्षीत अशा सर्वांनाच सायबर गुन्हेगारांकडून लुटण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आता राजकीय नेते देखील अशा प्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहिलेले नाहीत. बिहारमध्ये एका आमदाराला डिजीटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलाचे बिहारमधील विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य मोहम्मद शोएब यांना त्यांच्या पाटण्यातील निवासस्थानी सायबर गुन्हेगारांनी डिजिटल पद्धतीने अटक केली होती. इतकेच नाही तर अटकेदरम्यान त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती देखील काढून घेतली.

शोएब यांच्या तक्रारीनंतर १० एप्रिलच्या संध्याकाळी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींने त्यांच्यावर दबाव टाकला आणि घरातून बाहेर पडल्यास किंवा इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई बरोबरच अगदी मृत्यूची देखील धमकी दिली.

तक्रारीमध्ये ८ एप्रिलच्या रात्री साडे दहाच्या सुमारास दोन फोन क्रमांकावरून कॉल आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच आरोपीने आपण मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

आमदाराने काय सांगितलं?

“त्यांनी मला सांगितले की, मी मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी होतो आणि मुंबईतील कॅनरा बँकेतील खात्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे फसवे व्यवहार आणि बेकायदेशीर ऑनलाईन कृत्य केली आहेत,” असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी त्यांचा दावा खरा असल्याचे भासवण्यासाठी बनावट केस क्रमांक आणि एमएलसीशी सलग्न मोबाईल नंबर देखील सांगितला, असेही तक्रारीत म्हटले आहे.

आरोपींनी शोएब यांना मध्यरा‍त्रीपर्यंत व्हर्चुअली बंधनात ठेवले, या कालावधीत त्यांना सातत्याने कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. याबरोबरच त्यांना हे प्रकरण मिटवण्यासाठी बँकेशी संबंधित संवेदनशील खाजगी माहिती देखील देण्यास भाग पाडण्यात आले.

“त्यांनी माझी वैयक्तिक माहिती काढून घेतली. ज्यामध्ये आधार क्रमांक, जवळ असलेले सोने, रोख रक्कम यासारख्या मालमत्तेची माहिती आणि संपत्तीची संबंधी इतर तपशीलांचा समावेश होता. त्यांनी कोऱ्या कागदावर माझी सही देखील घेतली,” असे एमएलसी शोएब यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

“त्यांनी मला सांगितले की जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गेलात किंवा मदतीसाठी इतरांकडे गेलात तर तुमची हत्या होण्याची देखील शक्यता आहे,” असा आरोप शोएब यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने शोएब यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.