पीटीआय, गयाजी
सरकारी भरती परीक्षेदरम्यान बेशुद्ध झाल्यानंतर एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला. बिहारमधील गयाजी शहरात ही घटना घडली असून याप्रकरणी रुग्णवाहिकेचा चालक आणि एका तंत्रज्ञाला अटक करण्यात आली. या घटनेनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी राज्य सरकावर टीकास्त्र सोडले.

बिहारमधील बोधगया पोलीस ठाण्याच्या आवारातील मैदानावर गृहरक्षक भरती प्रक्रियेसाठी गुरुवारी चाचणी घेण्यात आली. यावेळी धावण्याच्या चाचणीदरम्यान ही तरुणी बेशुद्ध पडली. तिला घटनास्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून अनुग्रह नारायण रुग्णालयात नेण्यात आले. ती शुद्धीवर आल्यानंतर रुग्णवाहिकेत तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर रुग्णवाहिकेत असलेल्या चालक आणि तंत्रज्ञाला ताब्यात घेतले. महिलेने त्यांनाही ओळखले असून ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराची वैद्याकीय तपासणी पूर्ण झाली असून अहवालांच्या निष्कर्षांवरून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय पडसाद

या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासह विरोधी पक्षांनी बिहार सरकारवर टीका केली. ‘‘ही घटना निंदनीय आहे. दोषींना पकडले गेले असेल, परंतु प्रशासन अशा गुन्ह्यांना रोखण्यास स्पष्टपणे असमर्थ आहे. परिस्थिती भयावह आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रित करण्यास असमर्थ असलेल्या राजवटीला माझा पाठिंबा आहे याबद्दल मला वाईट वाटते,’’ असे पासवान म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी महिलांच्या संरक्षणासाठी नितीश कुमार सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी मतदान करा, असे आवाहन करत टीका केली.