Birthright Citizenship Order : अमेरिकेची दुसऱ्यांदा सूत्र हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांची जगभरात चर्चा असते, तर त्यांचे काही निर्णय वादात देखील अडकले आहेत. पण आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ‘सिटिझनशिप बर्थराइट’ धोरणाबाबत ट्रम्प यांच्या निर्णयाला रोखण्यास एक प्रकारे नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ६-३ मतांनी दिला असून हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे. ‘सिटिझनशिप बर्थराइट’ प्रकारच्या धोरणाला अडथळा आणणाऱ्या कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या आदेशांच्या व्याप्तीचा पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता कनिष्ठ न्यायालये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एक महत्त्वाचा बदल दर्शवित असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशाद्वारे जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या प्रयत्नातून हा खटला सुरू झाला होता. ट्रम्प यांच्या धोरणातील ‘सिटिझनशिप बर्थराइट’ अंमलात आणता येईल की नाही? हे मात्र या निर्णयाने निश्चित केलं नाही. आज सर्वोच्च न्यायालयाने जरी कनिष्ठ न्यायालयांच्या आदेशांवर पुनर्विचार करण्याचे सांगितले असले तरी ‘सिटिझनशिप बर्थराइट’ आदेशाला इतर कायदेशीर मार्गांनी आव्हान दिलं जाऊ शकतं.
‘बर्थराइट सिटिझनशिप’ कायदा काय आहे?
बर्थराइट सिटिझनशिप म्हणजे जन्माने मिळणारे नागरिकत्व. अमेरिकेत ते सध्या दोन प्रकारे मिळते. अमेरिकेत जन्माला आलेल्या अपत्यांना आणि ज्यांचे पालक अमेरिकेचे नागरिक आहेत अशांच्या अमेरिकेबाहेर जन्माला आलेल्या अपत्यांना नागरिकत्व जन्मसिद्ध बहाल होते. अमेरिकेच्या संविधानात १४ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत बर्थराइट किंवा जन्मसिद्ध नागरिकत्वाची तरतूद आहे.
या घटनादुरुस्तीला अमेरिकेतील अंतर्गत यादवीची पार्श्वभूमी आहे. १८६८ मध्ये यादवी संपुष्टात आल्यानंतर विशेषतः आफ्रिकेतून गुलाम म्हणून अमेरिकेत आणलेल्यांच्या पुढील पिढीला अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे, असा त्या घटनादुरुस्तीचा उद्देश होता. १३ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत गुलामगिरीला मूठमाती देण्यात आली. त्यामुळे त्याच्या पुढील पायरी म्हणून १४ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.