नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने भाजपला डिवचणारे सर्वेक्षण केले असून त्यातील प्रतिकूल अनुमानामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्ष संतप्त झाला आहे. या कथित सर्वेक्षणावर दिल्लीतील भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले असले तरी, केंद्रीय नेत्यांनी मात्र ‘आप’कडे दुर्लक्ष केले आहे.  या कथित सर्वेक्षणात अनेक वादग्रस्त ठरू शकतील, असे प्रश्न लोकांना विचारण्यात आले आहेत. त्यातील एका प्रश्नावर ७८ टक्के लोकांनी, भाजपमध्ये गुंड नेते अधिक असल्याचे मत व्यक्त केल्याचा दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. त्यावर, दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी ताहीर हुसेन हा भाजपचा नगरसेवक होता का, असा सवाल दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केला.

गेल्या महिन्यामध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवेळी जहांगीरपुरी परिसरात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारावरून ‘आप’ने भाजपवर टीका केली होती आणि भाजपबद्दल दिल्लीकरांच्या मनात कोणत्या भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल, असेही सांगितले होते. त्यानुसार, हे कथित सर्वेक्षण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वेक्षणातील निष्कर्ष जाहीर केले आहेत.

सीसोदियांच्या म्हणण्यानुसार, २१ एप्रिल रोजी ११ लाख ५४ हजार २३१ दिल्लीकरांशी फोनवरून, त्यांच्या घरी जाऊन त्यांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९१ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे नेते समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसही समाजामध्ये दुही निर्माण करतो. ८९ टक्के लोकांच्या मते भाजपमध्ये गुंड नेते आहेत. या तुलनेत ‘आप’मधील नेते मात्र शिक्षित, प्रामाणित आहेत, असे ७८ टक्के दिल्लीकरांचे म्हणणे आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक भाजपविरोधात जनमत तयार करण्याचा ‘आप’चा प्रयत्न असल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. वेगवेगळय़ा गुन्ह्यांमध्ये ‘आप’चे नेते अडकलेले आहेत. दिल्लीच्या मुख्य सचिवांवर हल्ला करणारा आमदार अमानुल्ला खान आपचा आमदार होता, असे गुप्ता म्हणाले. हे सर्वेक्षण खरोखरच विश्वसनीय असेल तर सिसोदियांनी ते कोणत्या एजन्सीकडून करून घेतले, हेही जाहीर करावे, असे आव्हान भाजपच्या नेत्याने दिले आहे.