Maharashtra Assembly Election 2019 BJP Candidate List :भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली.


भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील १९ जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. विदर्भ (३८), उत्तर महाराष्ट्र (११), मुंबई-ठाणे (२०), कोकण (२) , पश्चिम महाराष्ट्र (३७), मराठवाडा (१७) इतक्या जागांवरील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा : भाजपाच्या पहिल्या यादीत खडसे, तावडेंना स्थान नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम), अतुल भोसले (कराड दक्षिण), पंकजा मुंडे (परळी), राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), गिरीश महाजन (जामनेर), संदीप नाईक (ऐरोली), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोन्मेट), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), जयकुमार रावल (सिंदखेडा), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), मंदा म्हात्रे (बेलापूर) आदींचा पहिल्या यादीत समावेश आहे.