नवी दिल्ली : ‘‘आपल्याविरुद्ध दाखल केलली प्रकरणे खोटी असून, गुजरात विधानसभा प्रचारापासून रोखण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे,’’ असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी केला. अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिसोदिया यांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्याआधी त्यांनी हा आरोप केला. त्यांची सोमवारी चौकशी करण्यात आली.

ही चौकशी सुमारे नऊ तास चालली. चौकशीनंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सिसोदिया म्हणाले की, आजच्या या चौकशीत आम्हाला समजून चुकले आहे की, ही चौकशी म्हणजे भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चा भाग आहे. मी आप सोडून भाजपमध्ये जावे, त्यासाठी हा दबाव आणला जात आहे. 

‘सीबीआय’ कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी मथुरा रस्त्यावरील आपल्या निवासस्थानी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. ‘सीबीआय’ कार्यालयाकडे जात असताना सिसोदिया यांच्या ताफ्यात अनेक नेते व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या वेळी देशभक्तीपर गीते ऐकवली जात होती. या प्रवासात दोन ठिकाणी सिसोदिया थांबले.

त्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. ‘आप’च्या मुख्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले, की मी अटकेला अजिबात घाबरत नाही. मी सीबीआयच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करत आहे. महात्मा गांधीजींना मी आदरांजली वाहिली. त्यांच्याही विरुद्ध अशीच खोटी प्रकरणे दाखल झाली होती. भाजप मला खोटय़ा प्रकरणांत गोवून कारागृहात पाठवू इच्छित आहे. या देशास माझा उपयोग होत असेल, तर मला त्याचा अभिमान वाटतो. गुजरातमध्ये ‘आप’च्या लोकप्रियतेला पाहून भाजप धास्तावले आहेत.

सिसोदिया यांनी लागोपाठ केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की माझ्याविरुद्ध खोटे प्रकरण तयार केले गेले आहे. माझ्या निवासस्थानी छापा, लॉकरची झडती व माझ्या गावात केलेल्या झडतीमध्ये आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.

प्रचार थांबणार नाही : केजरीवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ‘ट्वीट’द्वारे सांगितले, की सिसोदिया यांच्या बँक लॉकरवरील छाप्यात काहीही मिळाले नाही. त्यांच्याविरुद्ध खोटे प्रकरण रचले जात आहे. त्यांना गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी जायचे होते. त्यापासून रोखण्यासाठीच त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गुजरातमध्ये ‘आप’चा प्रचार थांबणार नाही. प्रत्येक गुजरातवासीय आता जागरूक झाला आहे. तेथे चांगल्या शाळा, रुग्णालये, नोकरी-रोजगार आणि वीजपुरवठा मिळावे, यासाठी सामान्य व्यक्ती ‘आप’चाच प्रचार करत आहे.