BJP Receives Rs 945 Crore Electoral Bonds From Pharma Companies: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी शनिवारी आरोप केला की, भाजपाला औषध कंपन्यांकडून ९४५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स मिळाले आहेत. दूषित कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात २६ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावरून मध्य प्रदेशातील भाजपा सरकारवर टीका करताना दिग्विजय सिंह यांनी हे विधान केले आहे.
भोपाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की, औषध कंपन्या भाजपाला निवडणूक देणग्या देतात, त्यामुळे मध्य सरकारने औषध कंपन्यांवर कठोर कारवाई केली नाही.
“विषारी औषधे विकणाऱ्या कंपन्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला निवडणूक देणग्या दिल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत आहे”, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की, मध्य प्रदेशात २६ मुलांचा मृत्यू कोल्ड्रिफच्या सेवनामुळे झाला आहे, ज्यामध्ये ४८.६ टक्क्यांहून अधिक डायथिलीन ग्लायकोल होते. डायथिलीन ग्लायकोलचा औषधांमध्ये ०.०१ टक्क्यांइतका वापर करण्याचीच मर्यादा आहे.
“तपासात सिरपमध्ये विषारी रसायने असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे आता आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या पदावर राहावे का?”, असा प्रश्नही दिग्विजय सिंह यांनी यावेळी उपस्थित केला.
दिग्विजय सिंह यांनी असा दावा केला की, औषध कंपन्यांनी इलेक्टोरोल बाँड्सद्वारे भाजपाला एकूण ९४५ कोटी रुपये दिले आहेत. भाजपाला देणग्या देणाऱ्या कंपन्यांपैकी ३५ कंपन्या गुणवत्ता मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या आहेत.
२६ मुलांच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत झालेली कारवाई
अधिकाऱ्यांच्या मते, विषारी कोल्ड्रिफ सिरपचे सेवन केल्यानंतर छिंदवाडा आणि इतर जिल्ह्यांतील किमान २६ मुलांचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.
सोमवारी, कोल्ड्रिफ बनवणाऱ्या तामिळनाडूतील कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना मध्य प्रदेशातील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. विशेष तपास पथकाने (एसआयटी) यापूर्वी स्रेसेन फार्माचे मालक गोविंदन यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे नेले होते.
याचबरोबर या अधिकाऱ्याने सांगितले की, विषारी सिरप लिहून देणारे छिंदवाडा येथील डॉ. प्रवीण सोनी, औषधांचा घाऊक विक्रेता त्यांचा पुतण्या राजेश सोनी आणि डॉ. सोनी यांच्या पत्नीच्या मालकीच्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा फार्मासिस्ट सौरभ जैन हे न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
