अनेक जागांवर भाजपची मते खेचली; काँग्रेसला फायदा

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आल्यानंतर पक्षाकडूनही डावलले गेल्यामुळे स्वत:चा पक्ष काढणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर भाजपवर सूड उगवलाच! येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी या पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांची मते खाल्ल्याने काँग्रेसला त्याचा चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले.

त्याचवेळी २१६ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणाऱ्या येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला अवघ्या सहा जागा मिळून ‘डबल फिगर’ चाही टप्पा गाठता आलेला नाही. ‘केजेपी’ घटकाचा राज्यभर प्रभाव पडून उत्तर कर्नाटकात तर त्याहून अधिक प्रभाव पडला आणि भाजपला जबरदस्त पराभवाची धूळ चाखावी लागली. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करून आपण ‘किंग मेकर’ व्हावे, या महत्त्वाकांक्षेने येडियुरप्पा यांना घेरले होते. त्यापैकी भाजपला घरी पाठविण्याची त्यांची इच्छा सफळ झाली तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या इच्छेला मात्र चांगलाच लगाम लागला आहे. स्वत: येडियुरप्पा हे त्यांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार एच.एस. शांतवीरप्पा यांचा त्यांनी २४ हजार ४२५ मतांनी पराभव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाणवाटपांच्या प्रकरणांमुळे संकटात सापडलेल्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठी व त्यांच्यात मोठी फूट पडली होती. दुखावलेल्या येडियुरप्पांना पक्षात मानाचे स्थान देण्याऐवजी भाजपने त्यांच्या कट्टर विरोधकांना महत्त्वाची पदे दिली. त्यामुळे चिडलेल्या येडियुरप्पांनी भाजपला सोडचिठ्ठी देत निवडणुकीच्या सहा महिने आधी कर्नाटक जनता पक्ष (केजेपी) या नव्या पक्षाची स्थापना केली होती.