भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी चर्चच्या एका कार्यक्रमात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. इस्लामिक दहशतवादामुळे जागतिक स्तरावर ख्रिश्चन धर्माचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराक, सिरिया आणि भारतालगत असणाऱ्या श्रीलंकेत ख्रिश्चन धर्मीयाचं मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं आहे. एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्दाचं आवाहन करत असताना, इस्लामिक कट्टरतावाद्यांनी २०१८ मध्ये ऐन इस्टर सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिश्चनांची हत्या घडवून आणली होती, असंही केंद्रिय मंत्र्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन हे कन्नूर येथील थलासेरी येथे आर्चबिशप जोसेफ पॅम्पलनी यांच्या अभिषेकानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामिक दहशतवादाबरोबरच ‘लव्ह जिहाद’ याबाबतही मोठं भाष्य केलं आहे. तसेच इस्लामिक दहशतवादाबद्दल चर्चचं नेतृत्व चिंतेत असेल, तर यामध्ये काहीही गैर नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चर्चच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

लव्ह जिहादबाबत बोलताना मुरलीधरन पुढे म्हणाले की, ‘चर्चच्या बिशपांनी ‘जिहाद’ या शब्दाचा उच्चार जरी केला, तरी त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होतात. पण लव्ह जिहादबाबत चर्चच्या नेतृत्वाने बोलायचं नाही, तर मग कोण बोलणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ख्रिश्नन महिलांचं धर्मांतर करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याबाबतचे अनेक पुरावे देखील यापूर्वी समोर आले आहेत, असंही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दुसरीकडे, सीपीआय (एम) चे खासदार जॉन ब्रिटास यांनी आपल्या भाषणात मंत्री व्ही. मुरलीधरन किंवा भाजपाचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला आहे. “मेंढ्यांची कातडी पांघरून आलेल्या लांडग्यांपासून सावध राहा,” असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. अलीकडेच साध्वी ऋतंभरा यांना ‘हिंदूनी चार मुलांना जन्म द्यावा, त्यातील दोन मुलं विश्व हिंदू परिषदेला आणि संघाला द्यावीत,’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनी पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा उकरून काढला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader v muraleedharan controversial statement on islamic terrorism and love jihad rmm
First published on: 21-04-2022 at 21:29 IST