scorecardresearch

“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात”, म्हणणाऱ्या भाजपा आमदारांचं अजून एक विधान वादात; म्हणाले, “मदरशांवर…”

एमपी रेणुकाचार्य म्हणतात, “मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. मदरशांवर एकतर बंदी घातली जावी किंवा…!”

karnataka bjp mla mp renukacharya
कर्नाटकचे भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य

गेल्या महिन्यात कर्नाटकमधील भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. “महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे”, असं विधान हिजाब वादावर बोलताना रेणुकाचार्य यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेणुकाचार्य यांनी केलेलं विधान चर्चेत आलं असून त्यावरून वाद निर्माण होऊ लागला आहे. रेणुकाचार्य यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या एका मागणीमुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

“मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात”

माध्यमांशी बोलताना रेणुकाचार्य यांनी मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. “माझी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मदरशांवर बंदी घालावी. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलं इतर शाळांमध्ये शिकतच आहेत. पण मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. मदरशांवर एकतर बंदी घातली जावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम शिकवण्याची सक्ती करावी”, असं रेणुकाचार्य म्हणाले आहेत.

“काँग्रेससाठी व्होटबँक महत्त्वाची आहे का?”

“मला काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे की हिजाबचा वाद कुणी निर्माण केला? तुम्ही की आम्ही? मी काँग्रेसला विचारतो की आपल्याला मदरशांची गरज काय? मदरसे कोणत्या गोष्टींचं समर्थन करतात, प्रसार करतात? ते निरागस मुलांना भडकवतात. उद्या ते आपल्या देशाविरोधी जातील आणि कधीच भारत माता की जय म्हणणार नाहीत”, असं रेणुकाचार्य म्हणाले आहेत.

हिजाबच्या मुद्द्यावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यव्यापी बंदची घोषणा करणाऱ्यांवर देखील त्यांनी टीका केली आहे. हा बंद देशविरोधी आहे, असं ते म्हणाले आहेत.

“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्कार होतात”, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान!

“काही देशविरोधी संस्थांनी कर्नाटक बंदची घोषणा केली आहे. सरकारला हे चालणार आहे का? हा पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे की इतर कुठला इस्लामिक देश? आम्ही हे चालू देणार नाही. काँग्रेस नेत्यांनी विधिमंडळात याचं समर्थन केलं आहे”, असं रेणुकाचार्यांनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla mp renukacharya controversial statement on ban madrasas hijab pmw

ताज्या बातम्या