Anurag Thakur clarifies on India-Pakistan Asia Cup 2025 match IND vs PAK: आशिया चषक २०२५ स्पर्धेत उद्या म्हणजेच रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा समाना खेळवला जाऊ नये अशी मागणी होत असून सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि माजी क्रीडामंत्री यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ठाकूर म्हणाले की, अशा सामन्यामध्ये सहभागी होणे हे स्पर्धेच्या नियमांमुळे व्हावे लागते, हा काही भारताच्या धोरणामध्ये झालेला बदल नाही.

ठाकूर एएनआयशी बोलताना म्हणाले की, “जेव्हा एसीसी किंवा आयसीसी बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते, तेव्हा कोणत्याही देशासाठी सहभागी होणे अनिवार्य ठरते. जर त्यांनी सहभाग घेतला नाही, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले जाईल, त्यांना सामना गमवावा लागेल आणि गुण दुसऱ्या संघाला मिळतील. कोणताही खेळ असला तरी बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळावेच लागते. “

भारत सरकार हे पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय सामने खेळण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पण भारत पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय सामने खेळत नाही. अनेक वर्षांपूर्वीच आपण हा निर्णय घेतला आहे की भारत पाकिस्ताबरबोर द्विपक्षीय सामने खेळणार नाही जोपर्यंत पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले किंवा कारवाई नाही, आणि जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद संपवत नाही.”

विरोधकांची टीका

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह इतर विरोधी पक्षांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. यानंतर ठाकूर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. १४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून विरोधी पक्षांनी भाजपा आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र गुरुवारी, सर्वोच्च न्यायालयाने १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.