मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं सांगताना हा आरोप केला होता. दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजपानेच राज ठाकरेंविरोधात कट रचला होता का? अशी शंका उपस्थित होत आहे.

काय म्हणाले बृजभूषण सिंह ?

उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंचा विरोध आपण पक्षाचं काम म्हणून करत असल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, “मी सहा वेळा खासदार राहिलो आहे. एक वेळा माझी पत्नीदेखील खासदार राहिली आहे. अशाप्रकारे मी सातवेळा माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आम्हाला कोणी कशाला मनाई करेल?”.

यावेळी त्यांना तुम्ही पक्षाच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंचा विरोध करत आहात का? असं विचारण्यात आलं असता म्हणाले की, “मी पक्षाचं काम करत आहे”.

जर राज ठाकरे मला विमातळावर भेटले तर…

दरम्यान बृजभूषण शरण सिंह सोमवारी देवरियामध्ये पोहोचले होते. यावेळीही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधत आहे. जर मला कधी ते विमानतळावर भेटले तर नक्कीच हिसका दाखवेन,” असा इशारा त्यांनी दिला होता.

ते म्हणाले की, “एक दिवशी मी राज ठाकरे अयोध्येला येऊ इच्छित असल्याचं पाहिलं. मी २००८ पासून त्यांचा शोध घेत आहे. देवाकडे प्रार्थन करतो की एखाद्या दिवशी विमानतळावर जर आमची भेट झाली तर दोन हात करत त्यांना नक्की हिसका दाखवेन आणि धडा शिकवेन”.

“उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही. राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील तिथे त्यांना विरोध केला जाईल,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.

“राज ठाकरेंचं आता ह्रदय परिवर्तन झालं आहे. आता त्यांना हिंदू नेता होण्याची इच्छा आहे. आम्ही सर्व रामाचेच वंशज आहोत. त्यांनी भगवान रामाचा अपमान केला आहे. माफी मागितली तरच ते अयोध्येत येऊ शकतात,” असं ते म्हणाले.