राज्यसभेत शुक्रवारी (१० डिसेंबर) प्रदुषणावर संसदेची समिती गठीत करण्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर चर्चा झाली. यात भाजपा खासदार रामचंद्र जांगडा यांनी केलेल्या दाव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं दिसलं. प्रदुषणावर बोलताना खासदार जांगडा यांनी जनता कर्फ्युच्या काळात यज्ञ केल्यामुळे पत्नीचे डोळे बरे झाल्याचा दावा केला. यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) खासदार मनोज झा यांनी त्यांना चांगलंच सुनावत आपली डोकी साफ करण्यावर विचार करायला हवं, असं मत व्यक्त केलं.

भाजपा खासदार रामचंद्र जांगडा म्हणाले, “गावांमध्ये आजारांचा प्रकोप होत असताना लोक हवन आणि यज्ञ करतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वेगवेगळे आजार बरे होण्यास मदत होते. आपले पूर्वज आपल्यापेक्षा मोठे वैज्ञानिक होते. माझ्या घरात मागील वर्षी जनता कर्फ्युच्या काळात १४ तास यज्ञ करण्यात आले. माझ्या पत्नीला डोळ्यांच्या एलर्जीचा त्रास होता. डॉक्टरांनी तिला धुरापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. असं असतानाही पत्नी अनुष्ठानासाठी बसली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण यज्ञाने माझ्या पत्नीचे डोळे बरे केले.”

“गायत्री मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते”

“आज अमेरिकेचे वैज्ञानिक देखील गायत्री मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते हे मान्य करतात. मात्र, आपल्या देशात असं काही म्हटलं तर आपल्या देशातील काही लोकांच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का लागतो. ते याला धार्मिक म्हणतील. त्यामुळे आपल्याला या मानसिक प्रदुषणाला दूर करण्याची गरज आहे. तरंच आपण वायू प्रदुषणाशी लढू शकू,” असंही खासदार जांगडा यांनी सांगितलं.

हेही वाचा : “हे खरंच लाजिरवाणं आहे, जर तुम्हाला राजकीय हल्ला करायचाय तर…”, सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा!

“आपल्याला डोकं साफ करण्यावरही विचार करायला हवा”

भाजपा खासदाराच्या या दाव्याचा राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी चांगलाच समाचार घेतला. मनोज झा म्हणाले, “प्राधिकरणाचे तर्क प्रदुषणाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात गांभीर्य नसल्याचं दाखवत आहे. विषारी हवेमुळे समाजातील गरीब घटक सर्वाधिक प्रभावित होतो. मला वाटतं आपल्याला आपलं डोकं साफ करण्यावरही विचार करायला हवा. आपलं राजकीय जीवन किती प्रदुषित आहे हे पाहता हे करावं लागेल.”