पीटीआय, नवी दिल्ली

आम आदमी पक्षाचे (आप) नेते व मंत्री सत्येंद्र जैन तिहार कारागृहात पलंगावर पडलेले असताना त्यांची मालीश सुरू आहे, अशी दृश्ये असलेली चित्रफित समाज माध्यमांवर सर्वदूर प्रसृत झाली. त्यामुळे दिल्लीतील सत्ताधारी आप आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी शनिवारी झडू लागल्या.

५८ वर्षीय जैन हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. या चित्रफितीत जैन काही कागदपत्रे वाचताना दिसत आहेत. एक पांढरा टी शर्ट घातलेली व्यक्ती त्यांची मालीश करताना दिसत आहे. यावर खुलासा करताना ‘आप’चे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केले, की जैन यांना पाठीच्या दुखापतीमुळे ‘फिजिओथेरपी’चा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र भाजप त्यांच्या आजाराची खिल्ली उडवत आहे.

दिल्ली कारागृह विभाग आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतो. या आठवडय़ाच्या सुरुवातीला, तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना कारागृहात जैन यांना विशेष वागणूक दिल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते.जैन यांना तिहार कारागृहात विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) येथील न्यायालयात केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘केजरीवाल गप्प का?’
भाजपने शनिवारी आपचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी जैन यांच्या कारागृहातील वादग्रस्त चित्रफितीवर मौन बाळगल्याबद्दल सवाल उपस्थित केला. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, आम आदमी पार्टी (आप) ‘स्पा आणि मसाज पार्टी’बनली आहे. केजरीवाल यांनी जैन यांच्या कारागृहातील वर्तनाचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.