बाटला चकमक प्रकरणी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर भाजपची निदर्शने

बाटला हाऊस चकमकप्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेसच्या मुख्यालयाजवळ निदर्शने केली.

बाटला हाऊस गोळीबारातील दहशतवादी आयसिसशी संबंधित होते, असे निष्पन्न झाल्याने सोनिया गांधी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देशाची माफी मागावी, अशी भाजपची मागणी असल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.

पक्षाचे खासदार रमेश बिधुरी, उदित राज, मीनाक्षी लेखी आणि विजय गोयल निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांनी २४ अकबर मार्गाजवळ अडविले. काही निदर्शकांनी सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी, २००८ मधील बाटला हाऊस चकमक बनावट होती, असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले होते. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली होती. पोलिसांनी बाटला हाऊसवर छापा टाकला तेव्हा आपण तेथे होतो आणि त्यानंतर तेथून पसार झालो असा दावा आयसिसच्या एका व्हिडीओमध्ये एका इसमाने केला आहे. मात्र ज्या ठिकाणी इंडियन मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले त्याच खोलीत सदर इसम होता का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर २२ मिनिटांच्या व्हिडीओमधील सहा व्यक्तींची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एनआयएने म्हटले आहे.