काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही प्रेमाची आणि विश्वासाची आहे. पण शिवसेना-भाजपाची युती ही सत्तेसाठी आहे. इतकी कटुता आल्यानंतर हे एकत्र येतात ते फक्त सत्तेसाठीच, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना-भाजपा युतीवर टीका केली आहे. हे सरकार असंवेदनशील असून आपल्या जवानांवर एवढा मोठा हल्ला झाला. जवानांबरोबर आपण खंबीरपणे उभे राहायला हवे. अजित डोवल गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आहेत. आपल्या गुप्तचर यंत्रणेला इतके मोठे अपयश आले, याबाबत डोवल यांना कोण जाब विचारणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. मोदी सरकारची मुद्रा योजना ही अपयशी योजना असून यामुळे बँकांचे ४ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. सरकारनेच ही आकडेवारी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय नेत्यांच्या घराणेशाहीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, मी घराणेशाहीवर टीकाही करणार नाही किंवा त्याचे समर्थनही करणार नाही. घराणेशाहीमुळे राजकारणात पाऊल ठेवणे इतरांपेक्षा सोपे असते. आम्ही लोकातून निवडून येतो. घराणेशाहीमुळे तुम्ही हमखास निवडून याल याची खात्री नसते. सचिन पायलट, मुरली देवरा, प्रिया दत्त यांसारखे अत्यंत कार्यक्षम खासदार, मंत्रीही निवडणुकीत पराभूत होतात. घराणेशाहीमुळे पाऊल ठेवणे सोपे जाते याचा त्यांनी पुनरूच्चार केला. त्याचबरोबर घराणेशाही नसणारा देशात एकही पक्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी पक्षाचे नेतृत्व प्रश्न कोण करेन असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, अजित पवार यांच्याशी आपले अत्यंत चांगले संबंध आहेत. ते महाराष्ट्र पाहतात आणि मी दिल्लीचे पाहते. महाराष्ट्रा अजित पवार सांभाळतील. आमच्यात कधीच वाद होणार नाहीत हे मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगते, असेही त्या म्हणाल्या.

मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, हे सरकार ५ वर्षांत १० कोटी रोजगार देणार होते. आता त्यांची भाषा बदलली आहे. राज्यातील युती सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. या सरकारचं लक्ष नाही. हे असंवेदनशील सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

त्याचबरोबर मी माझ्या मुलांनाही राजकारणात येऊ नका, असा सल्ला देत असते. प्रथम शिक्षण, करिअर पूर्ण करण्यास मी त्यांना सांगितले आहे. मी प्रत्येकाला हेच सांगत असते. कोणालाही राजकारणात यायचे आहे त्यांनी प्रथम कशासाठी राजकारणात येताय हे ठरवले पाहिजे, अशा त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena alliance only for power says ncp mp supriya sule
First published on: 18-02-2019 at 19:12 IST