काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी बुधवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. भारतातील विविधतेत एकता असल्याचे सांगताना त्यांनी भाराताच्या विविध भागातील भारतीय कसे दिसतात, यावर भाष्य केले आहे. हे सांगताना त्यांनी भारतीयांना चीनी, अरब, पाश्चात्य आणि आफ्रिकन्स असल्याचे म्हटले आहे. भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले. त्यामुळे भाजपाने आता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीबाबत बोलत असताना पित्रोदा म्हणाले, मागच्या ७५ वर्षात भारतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. याकाळात काहीसे मतभेद झाले असतील पण ते तेवढ्यापुरतेच होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, पश्चिमेकडची लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखी आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो.

सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

सॅम पित्रोदा पुढे म्हणाले की, आपण सर्वच विविध भाषांचा, विविध धर्मांचा, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा सन्मान करत आलो आहोत. हा भारत देश आहे, ज्यावर आपल्या सर्वांचा विश्वास आहे.

वर्णद्वेषी टिप्पणी असल्याची भाजपाकडून टीका

पित्रोदा यांच्या विधानानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विधानाचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, सॅम भाई, मी ईशान्य भारतातून येतो. पण मी भारतीय लोकांसारखाच दिसतो. आपला देश विविधतेने नटलेला आहे. कदाचित आपण भिन्न दिसत असून पण आपण सर्व एकच आहोत.

अभिनेत्री आणि आता राजकारणात उतरलेली कंगना रणौतनेही सॅम पित्रोदांच्या विधानावर टीका केली आहे. पित्रोदा यांचे विधान वर्णद्वेषी आणि विभाजनवादी आहे. हे महाशय राहुल गांधी यांचे मार्गदर्शक आहेत, असेही कंगनाने म्हटले.

कंगना रणौत म्हणाली, सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी केलेले वर्णद्वेषी आणि विभाजनवादी विधान एकदा ऐका. त्यांनी भारतीय लोकांना चीनी आणि आफ्रिकन म्हटले आहे. काँग्रेसला लाज वाटली पाहीजे.

राम मंदिर की बेरोजगारी? देशासमोरची महत्त्वाची समस्या कोणती? सॅम पित्रोदांचा सवाल

वारसा करावरील विधानामुळे वादात अडकले

नुकतेच मागच्या महिन्यात सॅम पित्रोदा यांनी वारसा करावरून केलेली टिप्पणी काँग्रेसच्या अंगलट आली होती. या मुद्द्याचे भांडवल करून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. सॅम पित्रोदा म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील एका करासंदर्भात उल्लेख केला. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक टॅक्स आहे. जर एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेते. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत संपत्ती कमावली. पण निधनानंतर तु्म्ही तुमची संपत्ती जनतेसाठी सोडून गेले पाहिजे. सगळी संपत्ती नाही, पण किमान निम्मी संपत्ती. मला हे न्याय्य वाटतं”, असं पित्रोदा या चर्चेत म्हणाले होते.