पीटीआय, कोलकत्ता : ‘भाजप विरोधक असलेल्या पक्षांची जनतेने निवडलेली राज्य सरकारे पाडण्यासाठी भाजप काळय़ा पैशांचा आणि केंद्रीय सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे,’ असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी भाजपवर केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा निर्धारही ममता यांनी या वेळी व्यक्त केला.

येथे झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या सभेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, की आपल्यासह फिरहाद हकीम व अभिषेक बॅनर्जी यांच्यासह ‘तृणमूल’च्या वरिष्ठ नेत्यांविरोधात बदनामीची खोडसाळ मोहीम भाजपतर्फे सुरू करण्यात आली आहे. भाजप आपल्या सर्व विरोधकांना चोर ठरवत आहे. हकीमला नुकतेच केंद्रीय यंत्रणांनी चौकशीसाठी पाचारण केले. त्याला लवकरच अटक केली जाईल. ही कारवाई झाल्यास ती नक्कीच खोटय़ा आरोपाखालील अटक ठरेल. ‘तृणमूल’च्या नेत्यांच्या आर्थिक स्थितीवर भाजपतर्फे भाष्य केले जाते. मात्र, विरोधकांची महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सरकारे पाडण्यासाठी भाजपकडे हजारो कोटी रुपये कुठून येत आहेत? भाजप आपले काळे पैसे हवाला मार्गे परदेशात पाठवत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केलाच पाहिजे.

 ‘सत्तेत नसते तर जीभच हासडली असती!’

तृणमूल काँग्रेसचे आपण सर्व चोर असून फक्त भाजप व त्यांचे नेतेच पवित्र आणि सज्जन असल्याचे भाजपतर्फे भासवले जात आहे. मी जर राजकारणात नसते तर असे आरोप करणाऱ्यांची जीभच हासडली असती, असे संतप्त उद्गारही ममता यांनी  काढले.

बिल्किस बानोप्रकरणी धरणे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप ‘बेटी बचाओ’ आणि ‘बेटी पढाओ’चा गाजावाजा करत आहे. मात्र, त्यांचे गुजरात सरकार बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांना मुक्त करत आहे. हा न्याय आहे का? या आरोपींना पुन्हा अटक करण्याच्या मागणीसाठी ‘तृणमूल’तर्फे कोलकाता येथे ४८ तासांचे धरणे आंदोलन करणार असल्याचे ममता यांनी सांगितले.