भाजपच्या गैरहजर खासदारांना मोदींची समज

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नियमित आणि वेळेवर उपस्थित राहा. कामकाजात पूर्ण वेळ सहभाग असला पाहिजे. सभागृहात शिस्त पाळा, वाटेल तसे बोलू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या खासदारांची ‘शाळा’ घेतली.

संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात दर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होते आणि या बैठकीला मोदी आवर्जून उपस्थित राहतात. संसदेचे हिवाळी अधिवेशन गेल्या आठवड्यात सुरू झाले असले तरी मंगळवारी झालेली ही पहिलीच बैठक होती. गेल्या सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी विधेयके मागे घेतली होती. त्यामुळे संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली नव्हती असे सांगितले जात होते.

ही बैठक संसदेच्या ग्रंथालयात वा संसद सौदेमध्ये न घेता संसदेच्या आवाराबाहेर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र्रात घेण्यात आली. मोदींनी मंगळवारी झालेल्या बैठकीत मात्र भाजपच्या खासदारांची खरडपट्टी काढली. सभागृहात भाजपच्या खासदारांची उपस्थिती कमी असून काही खासदार कामकाजात सहभागी होत नाहीत वा त्यांच्या उपस्थितीत सातत्य नसते, अशी नाराजी मोदींनी व्यक्त केल्याचे समजते. लोकसभेत करोनावर सविस्तर चर्चा झाली, पण भाजपच नव्हे तर अन्य खासदारही अनुपस्थित होते. लोकसभेत सदस्यसंख्या कमी असल्याने संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना खासदारांना बोलवावे लागले होते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे तुम्हाला सारखे सांगावे लागते का? तुम्ही स्वत:च्या वर्तणुकीत बदल करा, नाही तर कालांतराने पक्षाकडून योग्य पावले उचलली जातील, अशी मोदींनी भाजपच्या खासदारांना समज दिल्याचे कळते.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील तीन महिन्यांमध्ये होणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. आता नागालँडमध्ये जवानांनी गैरसमजातून केलेल्या गोळीबाराचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील निवेदनाने विरोधकांचे समाधान झालेले नाही. खासदारांच्या निलंबनावरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत. इतके सगळे मुद्दे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गाजत असताना भाजपचे खासदार सभागृहात गैरहजर राहणे योग्य नसल्याचेही मोदी म्हणाल्याचे समजते. पावसाळी अधिवेशनातही भाजपचे खासदार गैरहजर राहिल्याने या वेळी मोदींनी गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जाते.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आदी उपस्थित होते.