पाटणा : देशातील विरोधी पक्षांच्या ऐक्याला गती मिळाली असून त्यामुळे भाजपला भीती वाटत आहे, त्यामुळे देशात लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या आधीच होतील, अशी शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केली. संतोष सुमन यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी आमदार रत्नेश सदा यांचा बिहारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावेळी राजभवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाकीत केले.

लोकसभा निवडणुका लवकर होतील असे नितीश कुमार यांनी यापूर्वीही बोलून दाखवले होते. आधी आपण थट्टेत बोललो असू, पण लवकर निवडणूक होण्याची शक्यता दाट आहे असे ते म्हणाले. सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्या पुढील वर्षीच होतील याची खात्री नाही, त्या आधीसुद्धा होऊ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मांझी यांच्यावर हेरगिरीचा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदूस्तानी अवामी मोर्चाचे (एचएएम) संस्थापक नेते जितन राम मांझी हे महागठबंधनच्या घटक पक्षांवर हेरगिरी करत होते असा गंभीर आरोप नितीश कुमार यांनी केला. मांझी यांना २३ जूनला होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी व्हायचे होते, मात्र ते बैठकीतील चर्चेचा तपशील भाजपला कळवतील अशी आपल्याला शंका होती. ते भाजपसाठी हेरगिरी करत होते, त्यांनी बाहेर पडणे हे महागठबंधनच्या भल्याचेच आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.