बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अन्य कलाकार आरोपी असलेल्या २० वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालय उद्या निकाल देणार आहे. सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. १९९८ साली राजस्थानच्या कानकानीमध्ये या कलाकारांनी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी चित्रीकरणासाठी हे कलाकार राजस्थानला गेले होते.

उद्या कोर्टाचा निकाल येणार असून सैफ, तब्बू आणि सोनाली बेंद्रे आज जोधपूरला येण्याची शक्यता आहे. अबूधाबीमध्ये रेस ३ चे चित्रीकरण संपवून सलमान कालच मुंबईत परतला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत काळवीटाची शिकार करणे प्रतिबंधित आहे. मागच्या आठवडयात जोधपूर ग्रामीण कोर्टाचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली. जवळपास १९ वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु आहे.

हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणात सलमानला थोडासा दिलासा मिळाला आहे. शस्त्रास्त्र कायद्याखाली सत्र न्यायालयाने त्याची सुटका केली. त्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. चिंकारा शिकार प्रकरणातही सलमानवर आरोप होते. चिंकाराचाही संरक्षित प्रजातींमध्ये समावेश होतो. चिंकारा शिकारीत त्याची निर्दोष सुटका झाली. राजस्थान उच्च न्यायालयानेही त्याच्या सुटकेचा निर्णय कायम ठेवला. राजस्थान सरकारने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिथे हे प्रकरण प्रलंबित आहे.