मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच आणि त्याचा मृतदेह समोर दिसताच त्याच्या आई वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत शेजाऱ्यांना दोन ते तीन दिवस काहीही कळलं नाही. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तीन मृतदेह फास लावलेल्या स्थितीत आढळून आले. ग्वाल्हेरमधल्या हुरावली भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना रविवारी ही घटना समजल्याचंही सांगितलं जातं आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार ज्या मुलाने आत्महत्या केली त्याची आई शाळेत मुख्याध्यापिका होती तर वडील प्रॉपर्टी डीलर होते. या दोघांनी त्यांच्या मुलाला मृतावस्थेत पाहिलं आणि या दोघांनीही गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांना जेव्हा या घटनेबाबत कळलं तेव्हा पोलीस या ठिकाणी पोहचले. तेव्हा त्यांना घरात तीन मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकत असल्याचं दिसलं. तसंच फरशीवर मोठ्या प्रमाणावर रक्त सांडल्याचंही दिसून आलं.

ग्वाल्हेरचे प्रॉपर्टी डीलर जितेंद्र झा (वय ५१) पत्नी त्रिवेणी झा (वय-४६) आणि त्यांचा मुलगा अचल (वय १७) अशी या घटनेतल्या तीन मृतांची नावं आहेत. अचल बारावीत होता. तर त्याचे वडील प्रॉपर्टी डीलर आणि आई मुख्याध्यापिका होती. सिरोल भागातल्या ए ब्लॉक कॉलनीत त्यांचं कुटुंब राहात होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती कशी मिळाली?

जितेंद्र झा यांचे सासरे हे झा यांच्या घरी आले. कारण त्यांचा फोन जितेंद्र झा उचलत नव्हते. तसंच त्यांची मुलगीही फोन उचलत नव्हती. नेमकं काय झालंय ते बघायला घरी आले तेव्हा ही घटना घडल्याचं समोर आलं. पोलिसांना अचलची सुसाईड नोट मिळाली आहे. ज्यानंतर तिन्ही मृतदेहांची फॉरेन्सिक चाचणी केलेल्या डॉक्टरांनी म्हटलंय की या तिघांनी आत्महत्या केली आहे असा निष्कर्ष काढला. डॉ. अखिलेश भार्गव यांनी ही माहिती दिली. तसंच जितेंद्र झा यांनी हाताची नस कापली होती, तसंच त्यांच्या पत्नीने म्हणजेच त्रिवेणीने हाताची नस कापून घेतली होती. त्यानंतर त्यांनी गळफास लावून घेतला. मुलाची आत्महत्या झाल्याचं पाहून पती पत्नी भांडले होते असंही समजतं आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.