ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दावा केला आहे की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याच्या आधी माझ्यावर मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली होती. बीबीसी सोमवारी (आज) ‘पुतिन वर्सेस द वेस्ट’ नावाचा एक नवीन माहितीपट प्रसारित करणार आहे. या माहितीपटानुसार २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी व्लादिमीर पुतिन यांनी जॉन्सन यांना फोन केला होता आणि त्यांना मिसाईल हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जॉन्सन म्हणाले की, “त्यांनी मला एक प्रकारे धमकी दिली, पुतिन म्हणाले की, बोरिस मला तुमचं नुकसान करायचं नाही, परंतु मिसाईल (क्षेपणास्त्र) हल्ल्याने असं करायला मला केवळ एक मिनिट लागेल.” जॉन्सन आणि इतर पाश्चिमात्य देशांमधील नेते युक्रेनला समर्थन दर्शवत आहेत. तसेच रशियाचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉन्सन हे युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर झेलेंस्की यांचे समर्थक आहेत.

बोरिस यांनी पुतीन यांना युक्रेनवरील हल्ला करण्यापासून रोखलं होतं

माहितीपटात बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं की, युक्रेनवरील हल्ल्याच्या आधी मी पुतिन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेन नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही, असंही मी पुतिन यांना सांगितलं होतं.

हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेचा आज समारोप समारंभ, शिवसेनेसह १२ पक्ष सहभागी होणार, ‘या’ ५ पक्षांना निमंत्रण नाही

जॉन्सन यांनी सांगितलं की, मी त्यांना (पुतिन) म्हटलं होतं की, तुम्ही युक्रेनवर हल्ला केलात तर तुमचा थेट सामना नाटोशी होईल. हा हल्ला करून तुम्ही नाटोपासून लांब नाही राहू शकत. तसेच तुम्ही जर युक्रेनवर हल्ला केलात तर रशिया देखील अडचणीत सापडेल. कारण पाश्चिमात्य देश रशियावर बंदी घालतील. तसेच नाटोचं रशियाच्या सीमेवरील सैन्यबळ वाढवलं जाईल.