तमिळनाडूमधील तिरुनेलवेली येथे एका ब्राह्मण मुलाचं जानवं चार अज्ञात हल्लेखोरांनी बळजबरीने कापल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे. मात्र तमिळनाडू पोलिसांनी या तक्रारीकडे लक्ष न दिल्यामुळे केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सदर प्रकार जाणून घेतला. तक्रार प्राप्त झाल्यानतंर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासलं असून त्यांना या घटनेचा सबळ पुरावा सापडलेला नाही. तक्रारदार एम. सुंदर (वय ५८) यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा अखिलेश (वय २४) हा दिव्यांग आहे. तो २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराजवळ असलेल्या ब्राह्मण समाज केंद्रात धार्मिक कार्यक्रमासाठी जात होता. दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याला अडवलं आणि त्याच्या अंगावरील जानवं कापलं. जानवं कापल्यानंतर हे पुन्हा घालू नको, असंही त्यांनी धमकावलं, असल्याचं एम. सुंदर आपल्या तक्रारीत म्हणाले.

एम. सुंदर यांनी त्याच दिवशी पेरुमलपुरम पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली. मात्र त्यांची तक्रार समुदाय सेवा रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आली. पोलिसांच्या मते, हा प्रकार अदखलपात्र आहे, असा आरोप एम. सुंदर यांनी केला. दुसऱ्या दिवशी काही हिंदुत्ववादी संघटनांनी या विषयावर आवाज उचलला. तेव्हा केंद्रीय मंत्री मुरुगन यांनी सदर कुटुंबियांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार जाणून घेतला.

हे वाचा >> “भाजपाला पूर्वी RSS ची गरज होती, आता…”, जेपी नड्डांच्या वक्तव्यावर संघाची प्रतिक्रिया; म्हणाले, “कौटुंबिक वाद…”

कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुरुगन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, अखिलेशवर झालेली हल्ल्याची घटना गंभीर असून तमिळनाडूमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच तमिळनाडू ब्राह्मण असोसिएशननं या घटनेला गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचं म्हटं आहे. ब्राह्मण समाज अशा घटनांनी घाबरून जाणार नाही, असे असोसिएशनच्या वतीने ठणकावून सांगण्यात आलं.

दरम्यान तिरुनेलवेली शहर पोलिसांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी अशी काही घटना घडल्याचेच नाकारले. निवेदनानुसार पोलिसांनी, घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असून त्यांना चार हल्लेखोरांनी अखिलेशचं जानवं हिसकावल्याचा एकही पुरावा मिळाला नाही.

हे ही वाचा >> “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखिलेशचे वडील एम. सुंदर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला पोलीस त्यांची तक्रारच नोंदवून घ्यायला तयार नव्हते. माझा मुलगा दिव्यांग असून तो घटनेचं परिपूर्ण कथन करण्यात असमर्थ ठरत आहे. अशावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून असा काही प्रकारच घडला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. पण मला खात्री आहे की, २१ सप्टेंबरच्या दुपारी माझ्या मुलाबरोबर काहीतरी घडलं आहे. तो संपूर्ण रात्र अस्वस्थ होता, मोठमोठ्याने रडत होता. मला पुन्हा जानवं घालू नका, असे तो सांगत होता. तो अजूनही धक्क्यातून बाहेर आलेला नाही