पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या चीनभेटीत चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह एकूण नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या ‘सीमा संरक्षण सहकार्य करारा’चाही समावेश आहे.
भारत आणि चीन या देशांमध्ये असलेल्या चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेवर शांतता-सहकार्य आणि सौहार्दता प्रस्थापित व्हावी आणि मतभेदाच्या मुद्दय़ावर तोडगा काढताना लष्करी मार्गाचा वापर टाळता यावा, यासाठी १० कलमे असलेला हा करार मान्य करण्यात आला. भारतातर्फे संरक्षण सचिव आर.के.माथुर यांनी तर चीनतर्फे पीपल्स लिबरेशन आर्मीचे उपप्रमुख लेफ्ट.जन. सुन जियांग्युओ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
* लष्करी कसरती, वायुदल क्षमता, विविध लष्करी कारवाया यांबाबत उभय देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यात येईल, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थैर्य, शांतता नांदावी यासाठी सर्व ते उपाय योजले जातील.
* वनसंपत्ती, वन्यजीव संपत्ती तसेच शस्त्रास्त्रे यांच्या तस्करीविरोधात संयुक्त लढा
* प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडताना चुकलेल्या – व्यक्ती, वाहने आणि पशू यांची माहिती उभयदेशांतर्फे परस्परांना दिली जाईल.
* संक्रामक, संसर्गजन्य आजारांविरोधात तसेच नैसर्गिक आपत्तींविरोधात लढण्यासाठी उभयपक्षी सहकार्य
* लष्करी पातळीवरील ‘फ्लॅग मीटिंग्ज’ आणि सीमावर्ती भागात समकक्ष लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चा यांच्यामार्फत सहकार्य वृद्धिंगत केले जाईल.
* ज्या ठिकाणी सीमारेषेबाबत एकमत नाही, अशा ठिकाणी प्रक्षोभक कारवाया टाळाव्यात, उभय देशांकडून मतभेदाच्या मुद्दय़ांबाबत आत्मनियंत्रण राखले जावे, तसेच सीमाप्रश्नावरून परस्परांवर कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये.
* सीमावर्ती भागात कोणत्याही देशाने संशयास्पद हालचाल केल्यास त्या देशाकडे संबंधित हालचालींबाबत स्पष्टीकरण मागता येऊ शकेल.
* मावर्ती प्रदेशात दोन्ही देशांद्वारे दिल्या जाणाऱ्या पहाऱ्यावर ‘लक्ष’ ठेवले जाणार नाही.
* तिमहत्त्वाच्या राष्ट्रीय सण, उत्सव किंवा लष्करी कसरती संयुक्तपणे साजऱ्या करता येतील, तसेच सीमावर्ती भागात सांस्कृतिक उपक्रमांचे संयुक्तपणे आयोजन केले जाईल.
* प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परस्पर सहमतीने लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी स्थलनिश्चिती करता येईल आणि नियोजित स्थळी दूरध्वनीद्वारे संपर्क
साधता येईल.
भारत आणि चीन यांच्यात जेव्हा-जेव्हा हस्तांदोलन होते, तेव्हा उभ्या जगाकडून त्याची दखल घेतली जाते.
– मनमोहन सिंग
आमच्यात अत्यंत मनमोकळी, प्रांजळ चर्चा झाली. यापुढे भारत-चीन-बांगलादेश आणि म्यानमार ‘कॉरिडॉर’ निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– ली केकियांग