दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन सुरू आहे. अशातच लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी आधी १०० महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आणि आता १,००० कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत असल्याचा आरोप ब्रिजभूषण यांनी केला. तसेच “मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?” असा सवाल केला. ते एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत लालकृष्ण अडवाणींचा रथ चालवला होता याचा संदर्भ देत मुलाखतकाराने अडवाणींवर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा देताना काय भूमिका घेतली हे सांगितलं. त्यानुसार अडवाणी म्हणाले होते, “राजकीय विश्वासार्हता खूप मुलभूत गोष्ट आहे. लोक आम्हाला मतं देतात. आम्हाला त्यांचा विश्वास कायम ठेवायचा आहे. मला माहिती आहे की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही. मी राजीनामा देतो.” तसेच तुम्ही अडवाणींचा रथ चालवला, मग तुमच्यात राजीनामा देण्याची हिंमत का येत नाही? असा सवाल केला.

“गुन्हेगार बनून राजीनामा देणार नाही”

यावर ब्रिजभूषण म्हणाले, “कुस्तीपटूंनी माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. मी लैंगिक अत्याचारातील गुन्हेगार बनून राजीनामा देणार नाही. माझा राजीनामा हे त्यांचं लक्ष्य नाही. अडवाणींचं आणि हे प्रकरण दोन्ही वेगळे आहेत. या प्रकरणात थेट चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”

“मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?”

“हे आधी म्हणायचे की, १०० मुलींबरोबर लैंगिक अत्याचार झाले. आता हे म्हणत आहेत की, १,००० मुलींबरोबर लैंगिक अत्याचाराचे प्रकार झाले. मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?” असा सवाल ब्रिजभूषण यांनी केला.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी आमच्या ‘मन की बात’ ऐकावी”, भारताला पदक मिळवून देणाऱ्या ‘दंगल गर्ल’चं विधान

“हे १५ दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते, फोटो काढून गेले”

“हे १५ दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते, फोटो काढून गेले आणि माझी प्रशंसा करत होते. १५ दिवसांनी त्यांना असं का वाटत आहे. १२ वर्षात यांच्याबरोबर काही घडलं असेल तर त्यांनी एखादा अर्ज पोलिसांकडे का दिला नाही? हे थेट जंतरमंतरवर आंदोलनासाठी गेले,” असा दावा ब्रिजभूषण यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brij bhushan singh big statement on sexual harassment allegations by women wrestler pbs
First published on: 01-05-2023 at 13:48 IST