भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीगीरांनी मंगळवारी पदके गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय भारतीय किसान संघटनेने समजूत घातल्यानंतर अखेरच्या क्षणी मागे घेतला. त्याचवेळी कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला आणखी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या सर्व प्रकरणावर ब्रिजभूषण सिंह यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी माझी चौकशी केली आहे”, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले. ते एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“महिला कुस्तीपटूंनी त्यांची पदके पाण्यात विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय होता”, असंही ब्रिजभूषण म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “या प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जर या आरोपांमध्ये कहीही तथ्य असेल तर मला अटक केली जाईल. तसंच, पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी कुस्तीगीर हरिद्वारला गेले. पण नंतर त्यांनी ती राकेश टीकैत यांच्याकडे सोपवली. ही त्यांची भूमिका आहे. आम्ही काय करू?” असंही ब्रिजभूषण म्हणाले.

हेही वाचा >> VIDEO : कुस्तीपटू पदकं विसर्जित करण्यासाठी गंगातीरी पोहचले, पण शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केली अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल नक्की काय घडलं?

ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी भारतीय कुस्तीगीर एका महिन्याहून अधिक काळ जंतरमंतरवर आंदोलन करीत होते. रविवारी निदर्शकांची धरपकड करत दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून हटविले. सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले तरी काही आघाडीच्या कुस्तीगिरांसह अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता कुस्तीगिरांनी मंगळवारी सकाळी आपली पदके गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे कुस्तीगीर संध्याकाळी पदकांसह हरिद्वारच्या गंगा काठावर पोहोचले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो पाठिराखेही हरिद्वारला पोहोचले होते. कुस्तीगीर तासभराहून अधिक काळ पदके हातात धरून बसले होते. प्रत्येकाच्या डोळय़ात अश्र होते. त्यामुळे वातावरण भावनात्मक झाले होते. या वेळी भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी मध्यस्थीकरून कुस्तीगीरांना पदक विसर्जित करण्यापासून रोखले. टिकैत यांनी कुस्तीगीरांची समजूत काढली आणि त्यांच्याकडून पदके आपल्याकडे घेतली. त्यानंतर सरकारला ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देत असल्याचे कुस्तीगिरांनी जाहीर केले.