लंडन : भारतीय वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार संजीव साहोटा व इतर तेरा जणांचा प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्काराच्या नामांकन  यादीत समावेश करण्यात आला असून साहोटा यांच्या ‘चायना रूम’ ही  कादंबरी पुरस्कारच्या स्पर्धेत  आहे. स्थलांतरितांच्या अनुभवाला वेगळे वळण देणारी साहोटा यांची ही कादंबरी आहे असे परीक्षकांनी म्हटले आहे.

साहोटा  ४० वर्षांचे असून त्यांचे आजी-आजोबा १९६० च्या दशकात ब्रिटनमध्ये आले होते. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांचे ‘दी इयर ऑफ रनवेज’ हे पुस्तक  बुकरच्या शर्यतीत होते. त्यांच्या पुस्तकाला नंतर २०१७ मध्ये युरोपीय समुदायाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता.  त्यांची कांदबरी ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या काळातील असून हा पुरस्कार कुठल्याही देशाच्या इंग्रजीतून लेखन करणाऱ्या लेखकांसाठी असतो. पण ती पुस्तके ब्रिटन किंवा आर्यलडमध्ये प्रकाशित झालेली असणे आवश्यक असते.

दोन खंडातील दोन कालखंडाची गुंफण ‘चायना रूम’ या कादंबरीत  असून त्यात स्थलांतरितांचे अनुभव, त्यांच्या  एका पिढीतून दुसऱ्या पिढीत चालत आलेल्या अनुभवांचे चित्रण केले आहे. त्यांच्या समवेत ब्रिटिश जपानी लेखक काझुओ इशिगुरो  यांचे क्लॅरा अँड दी सन, दक्षिण आफ्रिकन डॅमॉन गॅलुट यांचे दी प्रॉमिस, अमेरिकी लेखक रिचर्ड पॉवर्स यांचे बिविल्डरमेंट ही पुस्तके शर्यतीत आहेत. असामान्य कथांमध्ये वाचकाला गुंतवून ठेवण्याचे कसब या कादंबऱ्यांमध्ये आहे, असे २०२१ च्या निवड समितीतील इतिहासकार माया जॅसनॉफ यांनी म्हटले आहे.