संसदेचे विशेष अधिवेशन सप्टेंबर महिन्यात भरविण्यात आले होते. या अधिवेशनात भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यानंतर दानिश अली देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते भाजपाच्या रमेश बिधुरी यांच्याविरोधात कारवाई व्हावी म्हणून लढत आहेत. मात्र दानिश अली यांना त्यांच्याच पक्षातून मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एक पत्र प्रसिद्ध करून दानिश अली यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविल्याचे जाहीर केले. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बसपाने पत्र प्रसिद्ध करून दानिश अली यांच्यावर आरोप लावले आहेत. पत्रात लिहिले की, “पक्षाच्या धोरण, विचारधारा किंवा शिस्तीच्या विरोधात जाऊन कोणतेही विधान करू नये, असे तोंडी आदेश तुम्हाला (दानिश अली) दिले गेले होते. परंतु तरीही तुम्ही पक्षविरोधी कार्य करत आहात. पक्षाने तुम्हाला अमरोहा लोकसभेतून तिकीट देऊन संसदेत पाठविले. पण तुम्ही पक्षाच्या विरोधात जाऊन स्वतःच निर्णय घेत आहात. यासाठी पक्ष तुम्हाला तत्काळ निलंबित करत आहे.”

रमेश बिधुरी यांनी केली होती शिवीगाळ

भाजपाचे खासदार रमेश बिधुरी हे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेत चांद्रयान-३ च्या यशबाबत बोलत होते. तेव्हा बसपाचे खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-३ मोहिमेचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप केला. त्यावर रमेश बिधुरी संतापले आणि अपशब्दांचा उपयोग केला. “मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**…ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभं राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला”, असं रमेश बिधुरी म्हणाले.

रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ शिंहे यांनी सभागृहातच दिलगिरी व्यक्त केली. “जर (सत्ताधारी) सदस्यांच्या कोणत्याही विधानामुळे विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या अशतील, तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो’, असं राजनाथ सिंह म्हणाले होते.

काँग्रेसशी जवळीक वाढल्यामुळे कारवाई?

दानिश अली यांची काँग्रेसशी जवळीक वाढत असल्यामुळे बसपाची नाराजी वाढली असल्याचे सांगितले जाते. आज तकने दिलेल्या बातमीनुसार, बिधुरी प्रकरणानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे महासरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दानिश अली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. बिधुरी यांच्या शिवीगाळ प्रकरणामुळे भावूक झालेल्या दानिश अली यांनी काँग्रेसचे जाहीर आभार मानले होते. राहुल गांधी यांनी मला आधार दिल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे, असे ते म्हणाले होते.

राहुल गांधी यांच्यासह उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनीही दानिश अली यांची भेट घेतली. काँग्रेसचे नेते एक एक करून अली यांची भेट घेत असल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा झाली होती.

Story img Loader