नवी दिल्ली : उत्तराखंडमधील भूस्खलन व इतर नैसर्गिक संकटांचा संबंध विविध विकास प्रकल्पांशी जोडला जात असला तरी, ‘रोप वे’सारख्या प्रकल्पांतून केदारनाथ व हेमकुंड साहिब या दोन ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या ‘रोप वे’ प्रकल्पामुळे हेमकुंड साहिबला जाणाऱ्या भाविकांची संख्या १० पटीने वाढेल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केदारनाथला दरवर्षी २० लाखांहून अधिक भाविक जातात. शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांच्यामुळे हेमकुंड साहिबलाही मोठे महत्त्व असून तेथे दरवर्षी किमान दोन लाख भाविक भेट देतात. इथेच ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे प्रसिद्ध पर्यटनस्थळही आहे. या तीनही ठिकाणी पायी वा खेचरांवर बसून पोहोचता येते. हिमालयातील सातत्याने बदलणाऱ्या हवामानामध्ये हा प्रवास अत्यंत खडतर असतो. मात्र, हे ‘रोप-वे’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अत्यंत सहजपणे भाविकांना व पर्यटकांना तीनही स्थळांना विनासायास पोहोचता येईल. त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्यांची संख्या ५५ ते ६० लाख तर, हेमकुंड साहिबला जाणाऱ्यांची संख्या वीस लाखांच्या जवळपास पोहचू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरणाचे काय? या प्रकल्पांमुळे हॉटेल्स, रेस्तराँ व इतर पर्यटनविषयक उद्याोगांना चालना मिळेल. मात्र, त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये मोठे बांधकाम प्रकल्प उभे राहतील, तसेच वाढीव पर्यटकांमुळे उत्तराखंडातील संवेदनशील पर्यावरणावर ताण पडण्याची शक्यता व्यक्त आहे.