नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची (सीसीएस) बुधवारी बैठक झाली. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील एकंदर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला अशी माहिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानशी असलेले संबंध पाहता या हल्ल्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल याबद्दल विविध तर्क व्यक्त केले जात असताना या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते.
याखेरीज मंत्रिमंडळाची राजकीय व्यवहार समिती तसेच आर्थिक व्यवहार समितीची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. मात्र पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकांकडे पाहिले जात आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची बुधवारी फेररचना केली. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसची ही दुसरी बैठक होती. पंतप्रधानांनी मंगळवारी संरक्षणविषक उच्चस्तरीय बैठकीत लष्करी कारवाई कधी, कुठे आणि केव्हा करायची याचे अधिकार सैन्याला देत असल्याचा संदेश दिला होता.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिलला झालेल्या सीसीएसच्या पहिल्या बैठकीत सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासह पाकिस्तानविरोधात काही कठोर निर्णय घेण्यात आले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद केली आणि भारताबरोबरचा सर्व व्यापार थांबवला. त्यामध्ये तिसऱ्या देशामार्फत होणाऱ्या व्यापाराचाही समावेश आहे. तसेच सिंधू जलवाटप करार स्थगितीचा निर्णय युद्धाची कृती असल्याचा दावाही केला.
शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारताकडून समज
नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तान गोळीबार करत असल्याने भारताने समज दिली. याबाबत दोन्ही देशांच्या सैन्य मोहिमांच्या महासंचालकांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. मंगळवारी हा संवाद झाल्याचे सांगण्यात येते. पहलगाम येथील दहशतवादी हल्लानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली. भारताने संयम ठेवला असताना पाकिस्तान आगळीक करत असल्याचे यावेळी बजावण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्रभर गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले. जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले.
अलोक जोशी यांच्यावर सल्लागार मंडळाची धुरा
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची बुधवारी फेररचना केली. रॉचे माजी प्रमुख अलोक जोशी हे अध्यक्ष असतील. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडीकडे त्या दृष्टीने पाहिले जाते. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला हे मंडळ माहिती पुरवेल. सुरक्षा सल्लागार मंडळाच्या नव्या सदस्यांमध्ये पश्चिम विभाग माजी प्रमुख एअर मार्शल पी.एम.सिन्हा, दक्षिण विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल ए.के.सिंह, रिअर अॅडमिरल (निवृत्त) मॉंटी खन्ना यांचा समावेश आहे. याखेरीज माजी राजनितिज्ञ बी. वेंकटेश वर्मा आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी राजीव रंजन वर्मा हेदेखील सदस्य आहेत.
सुरक्षा सल्लागार मंडळाची फेररचना
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची बुधवारी फेररचना केली. रॉचे माजी प्रमुख अलोक जोशी हे अध्यक्ष असतील. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडीकडे त्या दृष्टीने पाहिले जाते. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाला हे मंडळ माहिती पुरवेल. सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्यांमध्ये माजी वेस्ट एअर कमांडर एअर मार्शल पी.एम.सिन्हा, माजी सदर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के.सिंह, रिअर अॅडमिरल (निवृत्त) मॉंटी खन्ना यांचा समावेश आहे. याखेरीज माजी राजनितिज्ञ बी. वेंकटेश वर्मा आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी राजीव रंजन वर्मा हेदेखील सदस्य आहेत.