पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा महिन्यांमध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन केले असून, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. यावेळी मोदी सरकार मंत्रिमंडळात शिवसेना आणि पीडीपी या मित्रपक्षाच्या सदस्यांना सहभागी करून घेण्याच्या तयारीतआहे.
नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल तीन आठवड्यांपूर्वीच सखोल चर्चा झाली होती. त्यावेळी मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणारी नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते. यामध्ये आनंदराव अडसुळ आणि अनिल देसाई या शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश होणार असल्याचे समजते.मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मोदींना हा निर्णय पुढे ढकलावा लागला होता. येत्या काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजपमधील एका उच्चपदस्थ नेत्याने दिली.
मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या वयाचाही विचार करण्यात आला आहे. याशिवाय, शिवसेना आणि पीडीपी या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासंदर्भातही भाजप नेत्यांमध्ये बराच खल झाला . मात्र, संसदेत प्रलंबित असलेले भूमी अधिग्रहण विधेयक तसेच वस्तू आणि सेवा कर विधेयकांचा विचार करता मंत्रिमंडळात मित्रपक्षाच्या जास्त सदस्यांना स्थान देणे अडचणीचे ठरू शकते, असा मतप्रवाहदेखील भाजपच्या नेत्यांमध्ये आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, पुढील वर्षी उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा विचार करता ब्राम्हण चेहरा असणारे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला वाटा, अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा महिन्यांमध्ये मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन केले असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे
First published on: 04-04-2015 at 11:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet reshuffle on pm agenda najma may go allies sena and pdp set to come in