गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कंपन्यांच्या व्यवसायामध्ये नुकसान झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपन्या घेतात. आता असाच प्रकार कॅनडामध्येही घडला आहे. कॅनडामधील बेल दूरसंचार कंपनीने १० मिनिटांच्या व्हिडीओ कॉलवर मीटिंग घेत तब्बल ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांना बोलण्याची परवानगी देखील देण्यात आली नाही.

कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय का?

बेल दूरसंचार कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येणार असल्याचे याआधीही जाहीर केले होते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय कंपनीने का घेतला? याबाबतचे स्पष्टीकरण अद्याप बेल दूरसंचार कंपनीकडून देण्यात आले नाही. बेल कंपनीच्या या निर्णयानंतर कामगारांनी संताप व्यक्त केला असून कॅनडातील खाजगी क्षेत्रातील काही कामगार संघटनांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

हेही वाचा : बजाजची सीएनजी दुचाकी रस्त्यावर कधी येणार? राजीव बजाज यांनीच दिलं उत्तर

ज्या कर्मचाऱ्यांना १० मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये कामावरून काढून टाकण्यात आले, त्यांच्यापैकी अनेकांनी बेल दूरसंचार कंपनीत वर्षानुवर्षे सेवा दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारे कामावरून काढणे हे चुकीचे असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. १० मिनिटांच्या व्हिडीओ मीटिंग दरम्यान कर्मचाऱ्यांना अनम्यूट (फोनचा माईक बंद) करण्यात आले होते. जेणेकरून कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रश्न विचारू नये. यानंतर व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकल्याची माहिती दिली.

‘बेल’च्या निर्णयानंतर युनिफोरने व्यक्त केली नाराजी

कॅनडातील खासगी क्षेत्रातील युनिफोर ही सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेत देशभरातील अंदाजे ३ लाख १५ हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. या संघटनेने ‘बेल’च्या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केली. युनिफोरचे संचालक डॅनियल क्लाउटियर यांनी एका निवेदनात म्हटले की, “ज्या सदस्यांनी या दूरसंचार कंपनीला वर्षानुवर्षे सेवा दिली, त्यांना अशा प्रकारे काढले जात असेल तर हे लाजिरवाणे आहे.”