पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची अखेर दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आणि त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांनी याबाबत समाधान व्यक्त केले, पण त्याच वेळी आंदोलन सुरू ठेवण्याचेही स्पष्ट केले.
ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल केला.
लैंगिक शोषणाबाबतच्या महिला कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करून ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर दिल्ली पोलिसांना शुक्रवारी ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला.
‘‘विजयाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. मात्र, आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया साक्षी मलिक यांनी व्यक्त केली. कुस्तीगीरांनी आंदोलनाच्या ठिकाणी ब्रिजभूषण यांच्यावर सुरू असलेल्या सर्व खटल्यांचे फलक लावण्यात आले आहेत.दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी सहा दिवसांचा अवधी लावला. त्यामुळे ते या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करतील याची खात्री नसल्याचे विनेश फोगट हिने सांगितले. ‘‘पोलिसांनी पोलीस आता काय कारवाई करतात ते पाहू आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेऊ. ब्रिजभूषण यांना अटक करावी आणि त्यांना सर्व पदांवरून त्वरित हटवण्यात यावे. तसे न झाल्यास ते चौकशीदरम्यान अडथळा आणतील,’’ असे विनेश फोगट म्हणाली.
दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक
विजेत्या (नीरज चोप्रा व अभिनव बिंद्रा) खेळाडूंनी ‘ट्विटर’वर आमचे समर्थन केले आहे. त्यांना आमचे दु:ख समजले. क्रीडा संघटनेचे अध्यक्षच असे गुन्हे करत असतील तर खेळाडूंनी जायचे कुठे? त्यामुळे त्यांच्यावर (ब्रिजभूषण) कठोर कारवाई झाली पाहिजे. – बजरंग पुनिया
बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह आघाडीच्या कुस्तीगिरांनी पुकारलेले आंदोलन शुक्रवारी, सलग सहाव्या दिवशी सुरू राहिले.