इम्फाळ : मणिपूरमधील युवक-युवतीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चार जणांना अटक केली आहे. त्यांना मृत्यूदंडासारखी अधिकात अधिक कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी सांगितले.

 अटक करण्यात आलेल्या चौघा जणांत मुख्य आरोपीच्या पत्नीचाही समावेश आहे. अटक केलेल्यांना विशेष विमानाने राज्याबाहेर नेण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी आधी अकरा वर्षे आणि नऊ वर्षे वयाच्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले होते, पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या दोघीही मुख्य आरोपीच्या मुली आहेत.

हेही वाचा >>> मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुईझ यांची निवड 

 फिजम हेमंजित (२० वर्षे) हा युवक आणि हिजम लिंथोइनगांबी (१७ वर्षे) ही युवती असे दोघेजण ६ जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे २५ सप्टेंबरला समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने सुरू केली. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २७ सप्टेंबरपासून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

युवक-युवतीच्या हत्येप्रकरणी सीबीआयने चुराचांदपूर जिल्ह्यातील हेंगलेप भागातून चार जणांना अटक केली आहे. या आरोपींची रवानगी राज्याबाहेर विशेष विमानाने केली आहे. अटकेच्या या कारवाईत लष्कर आणि निमलष्करी दलाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– एन. बिरेन सिंह, मुख्यमंत्री मणिपूर.