सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर एसबीआयनं निवडणूक रोख्यांसंदर्भातली सर्व माहिती जाहीर केली आहे. त्यात लॉटरी किंग सँतियागो मार्टिनच्या फ्युचर गेमिंग कंपनीनं सर्वाधिक १३६८ कोटींचे निवडणूक रोखे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना दिल्याचं समोर आलं. पण त्याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा उभारणी कंपनीनं तब्बल ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचं समोर आलं आहे. या कंपनीनं देशात विविध प्रकारचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. आता ही कंपनी सीबीआयच्या रडारवर आली असून लाच प्रकरणात या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CBI नं दाखल केला गुन्हा!

सीबीआयनं हैदराबादमधील मैघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) विरोधात लाच प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय एनआयएसपी, एनएमडीसी आणि मिकॉनमधील दोन पदाधिकाऱ्यांवरही या प्रकरणात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. जगदलपूर स्टील प्लांटशी संबधित १७४ कोटींची बिलं मंजूर करण्यासाठी ७८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

कोण आहेत मेघा इंजिनिअरिंगचे प्रमोटर्स?

पमिरेड्डी पिची रेड्डी आणि पी. व्ही. कृष्णरेड्डी हे मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्रमोटर्स आहेत. यासंदर्भात ३१ मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार १० ऑगस्ट २०२३ रोजीच सीबीआयनं या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली होती. जगदलपूरमध्ये जवळपास ३१५ कोटी रुपयांचा स्टील प्लांट उभारण्यात आला असून त्यात कथितरीत्या गैरव्यवहार झाल्याचा दावा एनएमडीसी लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी केला होता. यानुसार त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सीबीआयनं चौकशी सुरू केली होती.

मेघा इंजिनीअरिंग, शिर्के कन्स्ट्रक्शनच्या देणग्यांमध्ये ठरावीक ‘पॅटर्न’

“कंपनीशी संबंधित व्यवहारांमध्ये फायदा मिळावा म्हणून मेघा इंजिनिअरिंगचे प्रकल्प विभागाचे संचालक सुभाष चंद्रा यांनी एनआयएसपीचे माजी कार्यकारी संचालक प्रशांत डॅश यांना लाच म्हणून मोठी रक्कम दिली”, असा उल्लेख एफआयआरमध्ये असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

Electoral Bonds Data: निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी दान करणारे ‘दानशूर’ कोण आहेत माहिती आहे? वाचा पहिल्या २० दात्यांची माहिती!

“सीबीआयनं दाखल गुन्ह्यामध्ये ८ अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे. त्यात एनआयएसपी व एनएमडीसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यानुसार निवृत्त कार्यकारी संचालक प्रशांत डॅश, उत्पादन विभागाचे संचालक डी. के. मोहंती, डीजीएम पी. के. भुयान, डीएम नरेश बाबू, वरिष्ठ व्यवस्थापक सुब्रो बॅनर्जी, निवृत्त सीजीएम एल, कृष्ण मोहन, जीएम के. राजशेखर, व्यवस्थापक सोमनाथ घोष यांनी ७३ लाख ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे”, असाही उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.