Satya Pal Malik CBI Chargesheet: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. जम्मू-काश्मीरच्या किस्तवाड जिल्ह्यातील किरू हायड्रोपॉवर प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित सत्यपाल मलिक यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, इतर आरोपींमध्ये चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रा. लि.चे एमडी एम. एस. बाबू, बोर्डाचे संचालक एम. के. मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा, खासगी सचिव विरेंद्र राणा आणि कनवर सिंह राणा आणि एक खासगी व्यक्ती कंवलजीत सिंग दुग्गल या सहा जणांचे नावही आरोपपत्रात आहे.

किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडित कामांमध्ये २,२०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत २०२४ मध्ये सीबीआयने दिल्ली आणि जम्मूमधील आठ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. २०२२ साली जम्मू आणि काश्मीर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सीबीआयकडे केली होती. त्यानंतर सीबीआयकडून तपास सुरू करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्यपाल मलिक हे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. या काळात दोन फाईल मंजूर करण्यासाठी त्यांना ३०० कोटींची लाच देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी स्वतः केला होता. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याशी संबंधित एक फाईल होती, असेही त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी सीबीआयने दोन खटले दाखल केले होते आणि १४ ठिकाणी धाड टाकून तपास केला होता. सीबीआयने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनी आणि चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.