Celebi Aviation clarifies on security clearance Boycott Turkey : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादम्यान तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर भारतीय नागरिकांकडून तुर्किये मालावर बहिष्कार टाकला जात आहे. यादरम्यान भारत सरकारकडून सेलेबी एव्हिएशन या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कंपनी भारतातील प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो सेवा देते. भारतीय प्रशासनाने सेलेबी एव्हिएशन या कंपनीची सुरक्षा मंजूरी रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर आता या कंपनीने तुर्किय मालकीसंबंधीचे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.

या कंपनीचा तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्या कुटुंबाशी संबंध असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यादम्यान आता कंपनीने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कंपनीने त्यांचे कोणतेही राजकीय संबंध नाहीत तसेच कंपनी तुर्कियेच्या मालकीची नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ते कंपनीच्या नियंत्रणाबाबत सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यांचे स्पष्टपणे खंडन करतात. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, त्यांचा तुर्कियेच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी सुमेये एर्दोगान (Sumeyye Erdogan) यांच्याशी कोणताही संबंध नाही .

“कंपनाच्या मूळ संस्थेमध्ये सुमेये नावच्या कोणाचेही कसलेही शेअरहोल्डिंग नाही. कंपनीची मालकी ही सेलेबिओग्लू (Celebioglu) कुटुंबातील सदस्य कॅन सेलेबिओग्लू आणि कॅनन सेलेबिओग्लू यांच्यापुरती मर्यादीत आहे. आम्ही व्यावसायिकपणे चालवली जाणारी, जागतिक स्तरावर एव्हिएशन सेवा कंपनी आहोत,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

“आम्ही कोणत्याही स्टँडर्डनुसार टर्किश संस्था नाहीत, आणि आम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्स, पारदर्शकता आणि तटस्थता यासाठी जागतिक स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या पद्धती वापरतो. तसेच आमचे परदेशातील सरकार किंवा व्यक्ती यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध किंवा नाते नाही,” असेही निवेदनात कंपनीने स्पष्ट केले आहे.

तुर्कियेवर बहिष्कार का?

राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसचा परवाना तत्काळ रद्द केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि तुर्कीये पाकिस्तानला लष्करी मदत देत असल्याच्या, विशेषतः ड्रोन पुरवण्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओके मध्ये ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर तुर्कियेकडून भारतीय लष्करावर टीका करण्यात आली होती. इतकेच नाही तर तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर भारत सरकारकडूव सेलेबी एव्हिएशन या कंपनीवर कारवाई करणायात आली आहे. ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सेक्युरिटीज (बीसीएएस)ने सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिय लिमीटेड कंपनीचा सेक्युरिटी क्लिअरन्स काढून घेतला आहे.

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे सहसंचालक (ऑपरेशन्स) सुनील यादव यांनी स्वाक्षरी केलेल्या १५ मे रोजीच्या पत्रात म्हटले आहे की, “सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेली सुरक्षा मंजुरी बीसीएएसच्या महासंचालकांच्या अधिकाराखाली राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे. हा आदेश बीसीएएसच्या महासंचालकांच्या मान्यतेने जारी करण्यात आला आहे.”

सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस करत होती या विमानतळांची देखभाल

सेलेबी सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, मोपा आणि कन्नूर या नऊ विमानतळांवर भारतीय विमान वाहतुकीच्या ६५ टक्के वाहतुकीचे व्यवस्थापन करते. ही कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया म्हणून ग्राउंड हँडलिंग आणि दिल्ली येथे सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया म्हणून कार्गो सेवा प्रदान करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलेबी एव्हिएशन कंपनी मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ग्राउंड हँडलिंग सेवा देखील प्रदान करते. याचबरोबर सध्या भारतातील नऊ विमानतळांवर स्पाइसजेट आणि एफएलवाय ९१ ची ग्राउंड हँडलिंग ऑपरेशन्स देखील हाताळते. तसेच दिल्ली, मुंबई आणि चेन्नई विमानतळांवर उच्च-सुरक्षा देखभालीची कामे देखील ही कंपनी हाताळते. कंपनी भारतात दरवर्षी ५८,००० उड्डाणांचे व्यवस्थापन करते. त्यांचे भारतात ७,८०० कर्मचारी आहेत..