देशातील वेगवेगळ्या ठिकाणांची नावं बदलण्यावरून गेल्या काही महिन्यांपासून मोठं राजकारण सुरू आहे. नुकतंच महाराष्ट्रात देखील औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण संभाजीनगर आणि धाराशिव असं करण्यात आलं. त्यावरून देखील बराच काळ राजकीय दावे-प्रतिदावे सुरू होते. आता पुन्हा एकदा एका नव्या नामकरणावरून जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक ‘राजपथा’चं नामकरण लवकरच ‘कर्तव्यपथ’ असं करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका काय आहे प्रस्ताव?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणादरम्यान ब्रिटिश वसाहतवादाची आठवण करुन देणारं एकेक चिन्ह इतिहासजमा करण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. त्याला अनुसरूनच राजपथचं नामकरणं कर्तव्यपथ असं केलं जाणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात लवकरच प्रस्ताव मांडला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. राजपथावर नुतनीकरण केलं जात असून त्याचं उद्घाटन येत्या ८ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजपथाच्या नामकरणाचा मुद्दादेखील चर्चेत आला आहे.

काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?

महुआ मोईत्रा यांनी सोमवारी माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर टीकास्र सोडलं होतं. “हे काय चाललंय? भाजपानं आपली संस्कृतीच बदलून टाकण्याचं कर्तव्य ठरवून घेतलं आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

यानंतर आता मोईत्रा यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये बंगाली साहित्यिक सुकुमार रे यांच्या एका कथेचा एक भाग शेअर केला आहे. ‘ह ज ब र ल’ असं या कथेचं नाव असून त्यामधील मुलं प्रत्येक गोष्टीला अजब अशी नावं देतात. यासोबत मोईत्रा यांनी ट्वीटमधून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “मला माहिती मिळाली आहे की मोदी सरकार ‘राजपथ’चं नाव ‘कर्तव्यपथ’ असं करणार आहेत. मला आशा आहे की ते आता नव्या पंतप्रधान निवासस्थानाचं नाव ‘किंकर्तव्यविमूढ मठ’ असं करतील”, असा खोचक टोला मोईत्रा यांनी लगावला आहे.

एकीकडे विरोधकांनी आधीपासूनच या मुद्द्याला विरोध सुरू केला असताना नेमका केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव खरंच विचाराधीन आहे का? याविषयी तर्क सुरू झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Center to rename rajpath as kartavya path tmc mahua moitra hits out pmw
First published on: 06-09-2022 at 13:43 IST