वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या साडेदहा तास सुरू राहिलेल्या बैठकीअंती राज्यांशी झालेल्या सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला बुधवारी मंजुरी देण्यात आली. म्हणजेच १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल करण्यात आले, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासूनची ही सर्वात मोठी सुधारणा येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होईल आणि त्यामुळे ९३,००० कोटी रुपयांची महसूलात तूट सोसावी लागेल, असे सीतारामन यांनी बैठकीपश्चात रात्री उशीरा पत्रकार परिषदेत सांगितले. कर महसुलातील तूट ही ऐषारामी आणि हानिकारक पातकी वस्तूंसाठी ४० टक्के असा सर्वोच्च दराचा नवीन टप्पा लागू केल्याने भरून काढता येऊ शकेल. सुमारे ४५,००० कोटी रुपयांची यातून सरकारी तिजोरीत भर पडणे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व निर्णय जीएसटी परिषदेत एकमताने घेण्यात आले आणि मतदान घेण्याची वेळ आली नाही. नियोजित दोन दिवसांची बैठक ही एका दिवसातच संपविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे महसुलातील तोट्यासाठी राज्यांना भरपाई देण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

० आरोग्य व जीवन विमा हप्ते संपूर्ण करमुक्त

० नित्य वापराच्या अनेक वस्तूंवर १२ ऐवजी ५ टक्के कर

० एकूण ९३,००० कोटींचा कर महसूल घटणार

० ऐषारामी व पातकी वस्तूंवरील कराद्वारे ४५,००० कोटींची भर

० राज्याच्या महसुली तोट्याच्या भरपाईचा प्रश्न अनुत्तरीतच

काय स्वस्त?

० सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या नित्य वापराच्या वस्तू, केश तेल, साबण, सायकलींवरील जीएसटी १२ किंवा १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येईल.

० रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर शून्य कर:

० सर्व प्रकारचे टीव्ही, छोट्या मोटारी, ३५० सीसी मोटारसायकलींवर कर घटून १८ टक्क्यांवर

० हस्तकला, संगमरवर, ग्रॅनाइट ब्लॉक्सवरील ५ टक्के कर

० वैयक्तिक जीवन विमा, आरोग्य विमा पूर्ण कर्जमुक्त

० सिमेंट तसेच तीनचाकी वाहनांवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

काय महागणार?

० पान मसाला, तंबाखू उत्पादने, सिगारेट, तसेच साखरयुक्त पेयांवर ४० टक्के विशेष जीएसटी दर आकारला जाईल;

० १२०० सीसी पेट्रोल आणि १५०० सीसी डिझेल कारवर ४० टक्के कर